महाड : आंबेत पूल दीड वर्षांपासून बंद; वाहनचालकांची 40 किमीची फरफट, वेळ, पैसा वाया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

transport issue Ambet bridge closed one and half years 40 Kms of drivers wasted time and money mahad

महाड : आंबेत पूल दीड वर्षांपासून बंद; वाहनचालकांची 40 किमीची फरफट, वेळ, पैसा वाया

महाड : दीड-दोन वर्षांपासून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सावित्री नदीवरील (बाणकोट खाडी) आंबेत पूल दुरुस्तीसाठी वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.

सध्या वाहतूक महाडमार्गे होत असल्याने महाड शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. पर्यटकांबरोबरच खासगी प्रवासी कंपन्यांची वाहने शहरातून जात असल्याने महाडकरांना दररोज नाहक वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. दापोली व मंडणगड तालुक्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील जादा वेळ व पैसा खर्च करावा लागत आहे.

बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांच्या आंबेत गावात १९८० च्या दरम्यान पूल बांधण्यात आला. ३७६ मीटर लांबीच्या पुलामुळे दापोली, मंडणगड व खेड तालुक्याला मुंबईचा प्रवास सुखकर आणि जवळचा झाला. सावित्री पुलाची दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यानुसार कमकुवत व धोकादायक पुलांची दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश सरकारने दिले. त्‍यात आंबेत पुलाचाही समावेश होता.

डिसेंबर २०१९ पासून या पुलाची दुरुस्ती सुरू होती. त्यानंतर जून २०२१ मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. परंतु पुन्हा पुलाला धोका निर्माण झाल्याने २४ मार्च २०२२ पासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तेव्हापासून अद्यापही पुलावरील वाहतूक बंदच आहे.

महाडमध्ये वाहतूक कोंडी

आंबेत पूल बंद झाल्याने या मार्गे ये-जा करणारी सर्व वाहतूक महाड शहरातून होत आहे. यामुळे चांदे क्रीडांगण येथील शाळांजवळ मोठी वाहतूक कोंडी होते. याशिवाय छत्रपती शिवाजी चौक, भगवानदास बेकरी, भोईघाट, महाड बाजारपेठ या ठिकाणी कोंडी होते. चांदे क्रीडांगणाजवळ चार शाळा असून या विद्यार्थ्यांना कोंडीचा त्रास सहन करावा लागतो.

त्यामुळे अपघाताची भीती पालक वर्गातून व्यक्‍त होत आहे. महाडमधून प्रवास करणाऱ्यांना निश्चित मार्ग माहिती नसल्याने गुगलचा आधार घेऊन अनेक प्रवासी चुकीच्या मार्गाने प्रवास करतात. महाडमध्ये एक दिशा मार्ग असल्याने मुंबई व दापोलीमार्गे जाणारे प्रवासी एकेरी मार्गावर प्रवास करतात. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते.

शिरगावमार्गे वाहतूक वळवण्याची गरज

मुंबई-पुणे व अन्य लांब मार्गाच्या वाहनांना महाड शहरात प्रवेश न देता शिरगाव मार्गे महामार्गावरून ही वाहने वळविल्यास शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात येऊ शकते. महाड शहरांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी मुंबई व अन्य मार्गासाठी जाणारे दिशादर्शक फलक लावल्यास वाहन चालकांची ही गैरसोय दूर होऊ शकते परंतु अशी कोणतीही कार्यवाही वर्षभरामध्ये झालेली नाही.

त्यामुळे महाडकरांना नाहक वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. अवजड वाहने शहराबाहेरून न्यावीत, अशी महाडमधील नागरिकांची मागणी आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे.

प्रवासी, वाहनचालकांना भुर्दंड

सध्या मंडणगड व दापोली तालुक्यातील वाहतूक महाड मार्गे सुरू आहे. यामध्ये एसटीचा तब्बल ४० गाड्या तर शेकडो व्यापारी व खासगी वाहने महाड मार्गे जातात. एसटीचा विचार करता प्रवाशांना मुंबई,ठाणे,पुणे या भागात प्रवास करण्याकरता ४० किलोमीटरचे जादा अंतर कापावे लागते. याकरिता ४० रुपये जादा आकार प्रत्येक व्यक्ती मागे तिकीटा करता खर्च होतो.त्यामुळे प्रवाशांचा वेळ व पैसा वाया जात आहे.

आंबेत पूल बंद असल्यामुळे महाड शहरात होत असलेल्या वाहतूक कोंडीवर निश्चितच उपाय काढला जाईल.

- मिलिंद खोपडे, पोलिस निरीक्षक, महाड

टॅग्स :Transport