मंडणगडातील 'ही' पाच धरणे ओव्हर फ्लो...

सचिन माळी
Tuesday, 4 August 2020

पावसाची संततधार; चिंचाळी धरणात मात्र पाणीसाठा नाही.

मंडणगड : या तालुका परिसरात चांगला पाऊस सुरु असून तुळशी, भोळवली, पणदेरी, तिडे, व्याघ्रेश्वर ही मध्यम व लघु आकाराची धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू आहे. मात्र भिंतीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्याने चिंचाळी धरणात यावर्षी पाणीसाठा होणार नाही. तालुक्यात पावसाची संततधार सुरु असून 4 ऑगस्ट पर्यँत मंडणगड, म्हाप्रळ, देव्हारे मोजणी केंद्रात एकूण २०१६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

तालुक्यातील भोळवली धरण ६.९१, तुळशी धरण १.९६७, पणदेरी धरण ४ दशलक्ष, तिडे ७.५०७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता आहे. मात्र या धरणांचे कालवे अपूर्ण अवस्थेत आहेत. तिडे येथील धरणाच्या कालव्याचे काम सुरू आहे. या पाच धरणांच्या जलसाठ्याच्या माध्यमातून तालुक्‍यातील १३४६ हेक्‍टर जमीन ओलिताखाली येऊन शेतीकरिता पाण्याचा वापर केला जाणे अपेक्षित असुन ते फक्त कागदोपत्री आहे.

हेही वाचा - रत्नागिरीत शिक्षकांच्या बदल्या गेल्या लांबणीवर ; का वाचा.. 

पाणी गळती काढण्यासाठी चिंचाळी धरणाची भिंत दुरुस्ती

मंडणगड तालुक्‍यात १९७९ साली चिंचाळी हे पहिले धरण बांधण्यास सुरवात झाली. ४० वर्षानंतरही तांत्रिक दोषांमुळे ते आजही पूर्ण झालेले नाही. चिंचाळी धरणाची पाणीसाठा करण्याची क्षमता २.१४ दशलक्ष घनमीटर आहे. हे धरण सर्वांत आधी भरते मात्र पावसाळा संपल्यानंतर गळतीमुळे झपाट्याने याच्या पाणीसाठ्यात घट होते. धोकादायक बनलेल्या या धरणाच्या दुरुस्ती कामाला यावर्षी मुहूर्त मिळाला असून ओव्हरफ्लो होवून पाणी विसर्ग होणारी भिंत व माती काढण्यात आली आहे.

हेही वाचा - दर्याला कोकणवासीयांची साद, काय मागीतलय मागणं? 

पावसाळी पर्यटनात कोरोनाचा अडसर
पावसाच्या संततधारेने भारजा, निवळी नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. केळवत, तुळशी, पालवणी, चिंचाळी, उमरोली, घोसाळे, पणदेरी घाट आणि परिसरातील लहानमोठे धबधबे लक्ष वेधून घेत आहेत. कडीकपऱ्यातील हे  निसर्गसौंदर्य आणि धबधबे स्थानिक नागरिकांना साद घालत आहेत. त्यामुळे या परिसरातील  चिंचाळी, कोकणमळा पारकुंड, वेसवी येथील धबधब्यांवर विशेष गर्दी दिसून येत आहे.

पावसाळ्यात तालुक्यातील अनेक धबधबे प्रवाहीत होत असतात. त्यामुळे पर्यटकांचा ओढा जास्त असतो. यातून रोजगार निर्मीती कशी होईल या करिता वेगळ्या नियोजनाची आवश्यकता असते. पर्यटकांना अधिकाधीक सुविधा निर्माण करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे असते. मात्र यावर्षी कोरोना आणि लॉकडाऊन, निसर्ग वादळ या आपत्तींचा फटका पर्यटन व्यवसायाला बसल्याने परिसर ओस पडला आहे.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tulashi, panaderia, bholavali, tide, vyaghreshwar five dam overflow in mandangad ratnagiri