
हंगामातले पहिले घरटे; गस्तीला सुरुवात
दाभोळ (रत्नागिरी) : दापोली तालुक्यातील आंजर्ले, दाभोळ व कोळथरे येथील समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अद्याप अंडी घालण्यासाठी आलेली नव्हती; पण तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी शुक्रवारी (ता. १५) यंदाच्या हंगामातील कासवाचे पहिले घरटे सापडले. या घरट्यात ११२ अंडी आढळून आली आहेत.
दरवर्षी दापोली तालुक्यातील आंजर्ले, आडे, कोळथरे, दाभोळ या ठिकाणच्या समुद्रकिनाऱ्यावर समुद्री कासवे खड्डा खणून त्यात अंडी घालून खड्डा बुजवून निघून जातात. ही अंडी खड्ड्यातून बाहेर काढून समुद्रकिनारीच खड्डा खणून घरट्यांचे संरक्षण केले जाते. दरवर्षी आंजर्ले येथे कासव महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. येथे मोठ्या संख्येने पर्यटक कासवाची चिमुकली पिले घरट्यातून बाहेर येऊन समुद्राच्या दिशेने धाव घेत असतानाचा सोहळा पाहण्यासाठी येत असतात.
हेही वाचा- कासव संवर्धन; किनाऱ्यावर मिळाले पहिले घरटे -
गेल्या वर्षी आंजर्ले कासव मित्र संस्था यांच्यावतीने १४ मार्च ते ३१ मार्च या दरम्यान कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते; मात्र हा महोत्सव कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला होता. गेल्या वर्षी आंजर्ले समुद्रकिनारी ७ घरट्यात ७६९ कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली होती.
स्थानिक कासव मित्रांनी संरक्षित घरट्यातून बाहेर आलेल्या सर्व पिलांना समुद्राच्या दिशेने सोडले होते.विणीचा हंगाम थोडा लांबलानिसर्ग चक्रीवादळाचा कोकण किनाऱ्यावर बसलेला फटका तसेच सलग दोन वेळा समुद्राच्या पश्चिम उत्तर क्षेत्रात निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे यामुळे मादी कासवांचा विणीचा हंगाम थोडा लांबला. मात्र, आता तो सुरू झाल्याची चिन्हे असून आंजर्ले किनाऱ्यावर अजिंक्य केळसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी समुद्रकिनाऱ्यावर पहाटे व सायंकाळी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.
संपादन- अर्चना बनगे