प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सख्ख्या भावांची झाली एकाचवेळी भारतीय सैन्यदलात निवड

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

बेताची परिस्थिती असतानादेखील परिस्थितीपुढे गुडघे न टेकता जिद्द, चिकाटीच्या बळावर अजोड मेहनत घेऊन दोघेही मायभूमीच्या रक्षणासाठी सज्ज झाले आहेत.

खेड (रत्नागिरी) :  तालुक्‍यातील जांबुर्डे येथील अनिकेत महाडिक व अभिषेक महाडिक या दोन सख्ख्या भावंडांची एकाचवेळी भारतीय सैन्यदलात निवड झाली आहे. त्यांची एकत्रितरित्या भारतीय सैन्यदलात निवड झालेली तालुक्‍यातील ही पहिलीच घटना आहे.

यामुळे तालुक्‍याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शिक्षण घेत असतानाच सैन्यदलात भरती होण्याची महत्वाकांक्षा उराशी बाळगणाऱ्या अनिकेत व अभिषेक या दोघांनी घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाचा मार्ग चोखळला आहे. दररोज पहाटे ४ वा. उठून सायकलवरून दूरवरचा प्रवास करत सैन्यदलातील धडे घेण्यासाठी किशोर आदावडे यांच्याकडे सरावासाठी जात होते.

हेही वाचा- वॉटर स्पोर्टस्‌वर मेरीटाईमचा दंडुका

बेताची परिस्थिती असतानादेखील परिस्थितीपुढे गुडघे न टेकता जिद्द, चिकाटीच्या बळावर अजोड मेहनत घेऊन दोघेही मायभूमीच्या रक्षणासाठी सज्ज झाले आहेत. अनिकेतला नाशिक येथील आर्टिलरी तर अभिषेकला मध्यप्रदेश येथील एस. टी. सी. जबलपूर हे सेंटर मिळाले आहे. भरतीपूर्व कालावधीत बोरज येथील किशोर आदावडे यांच्यासह मंगेश देवळेकर, राकेश तांबट, प्रेम मर्चंडे, ऋषिकेश दळवी यांच्यासह येथील आर्मी ग्रुपच्या सदस्यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two brother at time Selection in the Indian Army khed ratnagiri