अंजनवेलजवळील दोन चिनी नौकांचे गूढ कायम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जून 2019

दाभोळ - अंजनवेलजवळील समुद्रात दोन चिनी मच्छीमारी नौका विनापरवाना भारतीय समुद्राच्या हद्दीत आढळून आल्या होत्या. Fuyuanyu ५९, Fuyuanyu ६१ अशी चिनी नौकांची नावे आहेत. यासंदर्भात आजही सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. शिपिंग एजंटची चौकशी सुरू आहे.

दाभोळ - अंजनवेलजवळील समुद्रात दोन चिनी मच्छीमारी नौका विनापरवाना भारतीय समुद्राच्या हद्दीत आढळून आल्या होत्या. Fuyuanyu ५९, Fuyuanyu ६१ अशी चिनी नौकांची नावे आहेत. यासंदर्भात आजही सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. शिपिंग एजंटची चौकशी सुरू आहे. हे प्रकरण गुंतागुंतीचे होण्याची शक्‍यता आहे. वादळाचा धोका लक्षात घेऊन दोन्ही नौका दाभोळ खाडीत आणण्यात आल्या आहेत.

सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय तटरक्षक दल, सीमासुरक्षा दल व सागरी पोलिसांनी नौकांकडे धाव घेतली होती. या प्रकरणाची चौकशी गेले चार दिवस सुरूच आहे. यातून काही धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्‍यता आहे. समुद्रातील वादळाचा धोका लक्षात घेऊन या दोन्ही नौका आज संध्याकाळी दाभोळ खाडीत आणण्यात आल्या. नौकांवरील खलाशांची कागदोपत्री नोंदलेली संख्या व प्रत्यक्षातील संख्या यात तफावत आढळून आली आहे.

दोन खलाशांच्या पासपोर्टची मुदतही संपलेली आहे. त्या सर्व खलाशांची चौकशी करताना अधिकाऱ्यांना भाषेची अडचण येत आहे. त्यांना इंग्रजीचा गंधही नाही. यामुळे त्यांच्याकडून माहिती घेताना अडचण येत आहे. अधिकाऱ्यांनी मोबाईलवरील एका ॲप्लिकेशनची मदत घेतली असून त्यात इंग्रजीतून प्रथम प्रश्न विचारला जातो. तो या बोटीच्या कप्तानाला त्याच्या भाषेत भाषांतरित होतो. त्याचे उत्तर कप्तान त्याच्या भाषेत देतो, ते परत इंग्रजीत भाषांतर करून घ्यावे लागत आहे. हे सर्व प्रकरण गेले चार दिवस शासकीय यंत्रणा एक दुसऱ्याच्या अंगावर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक या संदर्भात चौकशीसाठी दाभोळ येथे येणार होते; मात्र ते आज आले नाहीत. ते उद्या येणार असल्याची माहिती मिळाली. यामध्ये देशाच्या सुरक्षेचा प्रश्‍न असून या प्रकरणाला चार दिवस उलटून गेले तरी पुणे विभागाचे सीमाशुल्क आयुक्त यांनी दाभोळ येथे अजूनही भेट दिलेली नाही. पुणे येथे बसून दापोलीतील सहायक आयुक्तांकडून माहिती घेत आहेत. दापोलीतील काही नागरिकांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान कार्यालयाकडे ट्‌वीट करून सीमाशुल्क आयुक्तांची तक्रार केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two china boat in Anjanvel