फिल्मी स्टाईलने दामदुपटीच्या आमिषाने मित्रालाच घातला दोन कोटींचा गंडा...  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

two crores bundled with a blanket baits in ratnagiri kokan marthi news

ठाण्याच्या दांपत्याची फसवणूक; एकाच कुटुंबातील सात जणांवर गुन्हा, चौघांना अटक...

फिल्मी स्टाईलने दामदुपटीच्या आमिषाने मित्रालाच घातला दोन कोटींचा गंडा... 

खेड (रत्नागिरी) : जमीन खरेदी व पेट्रोलपंपात पैसे गुंतवा, थोड्याच दिवसांत दुप्पट करून देतो, अशी बतावणी करून ठाणे येथील कदम दांपत्याची सुमारे एक कोटी ९७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तालुक्‍यातील सवेणी येथील एकाच कुटुंबातील सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच संशयितांपैकी तिघांनी पळ काढला. मात्र, चौघांना खेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

खेड-खोपी मार्गावर असलेल्या सवेणी गावातील एकाच कुटुंबातील नितीन श्रीराम भाबल, राजेश श्रीराम भाबल, चिन्मय नितीन भाबल, अक्षय नितीन भाबल, प्रथमेश नितीन भाबल, नम्रता नितीन भाबल, प्रणाली राजेश भाबल या सर्वांनी संगनमताने ठाणे येथील संजय सीताराम कदम यांची फसवणूक केली. भाबल कुटुंबीयांनी ठाणे येथे राहणारे संजय कदम व त्यांच्या पत्नीशी घरोब्याचे संबंध निर्माण करून त्यांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी कदम यांना जमिनी खरेदीत व पेट्रोल पंप खरेदीमध्ये पैसे गुंतवा, आम्ही तुम्हाला ते दुप्पट करून देऊ, असे आश्‍वासन दिले. 

हेही वाचा- सावधान !  धुळीने होतोय श्‍वसनाचा धोका..
 

भाबल यांच्या बतावणीवर विश्‍वास ठेवून कदम दाम्पत्याने त्यांना फेब्रुवारी २०१७ ते आजतागायत जमिनी खरेदीसाठी ५२ लाख तर पेट्रोल पंप खरेदीसाठी १ कोटी रुपये दिले. पेट्रोल पंपाचे खरेदीखत करताना संशयितांनी खरेदीखतात स्वत:चे नाव घुसवून कदम यांची फसवणूक केली. या व्यवहारामध्ये साक्षीदार असणाऱ्यांचीही वारंवार फसवणूक करून भाबल कुटुंबीयांनी त्यांच्याकडून ४५ लाख रुपये घेतले. कदम व साक्षीदारांची फसवणूक करून घेतलेले पैसे या सर्व संशयितांनी आपसात वाटणी करून बॅंक खात्यावर वर्ग करून घेतले आहेत.भाबल कुटुंबीयांकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर कदम दाम्पत्याने सवेणी येथील भाबल यांच्या घरी जाऊन पैशाची मागणी केली; मात्र त्यावेळी दोघांनाही शिवीगाळ करत धमकी देण्यात आली.

हेही वाचा-  अबब...सांगलीतून 70 तोळे सोने पळविले -

चौघांना कोठडी

भाबल कुटुंबाकडून पैसे परत मिळणार नाहीत हे लक्षात आल्यावर कदम व त्यांच्या पत्नीने खेड पोलिसांत २२ फेब्रुवारीला सायंकाळी तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची खबर संशयितांना लागताच यातील संशयित नितीन श्रीराम भाबल, राजेश श्रीराम भाबल व नितीन याचा मुलगा प्रथमेश नितीन भाबल या तिघांनी पळ काढला. मात्र, पोलिसांनी रात्री कारवाई करून चिन्मय नितीन भाबल, सौ. नम्रता नितीन भाबल, सौ. प्रणाली राजेश भाबल व अक्षय नितीन भाबल या चौघांना सवेणी येथील घरातून अटक केली. चारही संशयित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. फरारी संशयितांचा खेड पोलिस शोध घेत आहेत.