दोन नौकांना लागला बंपर सरंगा अन् एका दिवसातच मच्छीमार झाले लखपती 

Two fishermen found saranga fish
Two fishermen found saranga fish

रत्नागिरी - ‘निसर्ग’ चक्रीवादळ, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले वातावरण निवळले असून त्याचा फायदा मच्छीमारांना होऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी मिरकरवाडा येथील एक बंपर घोळ मासा लागला होता. ती घटना ताजी असतानाच दोनच दिवसांपूर्वी जयगड येथील दोन नौकांना बंपर सरंगा जाळ्यात सापडला. प्रत्येकी अडीच टन सरंगा नौकांना लागला असून ऐन दसर्‍यात दोघांचीही दिवाळी झाली आहे. 

400 रुपये किलोने सरंगा विक्रीला गेला असून दहा लाखाची लॉटरी मच्छीमारांना लागली.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राकडे सरकत पुढे गेला. बिघडलेल्या वातावरणामुळे समुद्र खवळल्याने मच्छीमारी ठप्प झाली होती. 10 ऑक्टोबरपासून 20 ऑक्टोबरपर्यंत समुद्र खवळलेलाच होता. या कालावधीत मासळी मिळत नव्हती. बुधवारी (ता. 21) वातावरण निवळल्यानंतर नौका मासेमारीसाठी रवाना झाल्या. गुरुवारी सायंकाळी जयगड येथील दोन नौकांनी खोल समुद्रात डोल सोडली. बघता-बघता जाळ्यात बंपर सरंगा सापडला. त्या सरंग्याचा व्हिडिओही मच्छीमारांनी करून सोशल मीडियावर व्हायरल झाला. आजूबाजूच्या नौकाही तिथे दाखल झाल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी मिरकरवाडा येथील मासेमारी नौकेच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणावर घोळ मासा सापडला; मात्र जाळे फाडून तो मासा निघून गेला. गुरुवारी जयगड येथील दोन नौकांच्या जाळ्यात सरंगा मिळाला. एकाचवेळी दोन बोटींना पाच टन रिपोर्ट लागल्याची बातमी जयगड परिसरात अवघ्या काही वेळात पसरली. गुरुवारी सायंकाळी बंपर सरंगा घेऊन दोन्ही नौका जयगड बंदरावर दाखल झाल्या. जेटीवरच मासळीचा लिलाव करण्यात आला. एका किलोला 400 रुपये सरंग्याला मिळाल्याची चर्चा सुरू आहे. सुमारे 15 ते 20 लाखाची मासळी मिळाल्याने ते मच्छीमार एकाच दिवसात लखपती झाले आहेत.

यंदाच्या मोसमात सुरवातीलाच बदलत्या वातावरणाचा मासेमारीला फटका बसला. आधी क्यार वादळ आणि नंतर समुद्रात अचानक कमी दाबाचा पट्टा यामुळे महिनाभर मासेमारी ठप्प होती. कोट्यवधीचा फटका बसला होता. समुद्रात गेलेल्या नौकांना माघारी परतावे लागत होते. यंदा म्हणावा तसा रिपोर्ट लागत नव्हता; मात्र वादळ सरून गेल्यानंतर मच्छीमारांना अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. वादळ सरल्यानंतर मासळी किनारी भागाकडे वळू लागली असून, अचानक लागलेला बंपर सरंगा ही मच्छीमारांसाठी दिलासादायक बाब आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com