आम्हालाही पोट आहे, उपाशीपोटी किती दिवस राबायचं ? एसटी कर्मचाऱ्यांची आर्त हाक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

गणेशोत्सवासाठी आलेल्या मुंबईकर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासामध्येही एसटीने महत्वाची भूमिका बजावली.

राजापूर : कोरोनाच्या संकटामध्ये गावोगावी धावून एसटीने दळणवळणाच्या दृष्टीने सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला आहे. मात्र, या ‘लालपरी’च्या धावण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावण्यासह तिचे व्यवस्थापन पाहणारे चालक-वाहकांसह प्रशासकीय कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतनाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे उद्‌गीन झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांकडून उपाशीपोटी आम्ही आणखीन किती दिवस काम करायचे, आम्हालाही पोट आहे की नाही, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.    

हेही वाचा - कोयना प्रकल्पाच्या सर्जवेलमधील गळती काढण्यासाठी हालचाली सुरु

 

कोरोना रोखण्यासाठी लॉकडाउनच्या काळात एसटी गाड्या बंद ठेवल्या होत्या. मात्र, लोकांच्या दळणवळणासह प्रवासाचे होत असलेले हाल लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर नियोजन करून गावोगावी एसटी सुरू झाली. गणेशोत्सवासाठी आलेल्या मुंबईकर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासामध्येही एसटीने महत्वाची भूमिका बजावली. मात्र, तरीही या कर्मचाऱ्यांचा जून महिन्यापर्यंतचा पगार एसटी महामंडळासह शासनाकडून दिला आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा पगार रखडला आहे. सप्टेंबरचाही पगार होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. 

राजापूर आगारासाठी ६० लाख

एसटी विभागामध्ये राज्यभरामध्ये लाखो वाहक-चालकांसह अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या पगारासाठी दरमहा सुमारे २७० कोटी रुपये खर्च होतो. राजापूर आगाराचा विचार करता या ठिकाणी सुमारे साडेतीनशे वाहक, चालक, अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या पगारासाठी सुमारे साठ लाख रुपये खर्च येतो.

हेही वाचा - भंगारात काढायचे की, दुरुस्त करायचे ? अखेर त्या जहाजाचा होणार निर्णय

 

"एसटी कर्मचाऱ्यांना मुळातच तुटपुंजा पगार. तोही वेळेवर नाही. शासनाने याचा विचार करून आमचा प्रलंबित असलेला पगार तातडीने करावा."

- एक त्रस्त एसटी कर्मचारी, राजापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two months payment of state road transportation employees question against organisation in ratnagiri