स्वप्नं राहिली अपुरीच! दोन युवकांवर काळाचा घाला 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

अमित माइन याचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झाला होता. तो मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये कामाला होता.

देवरूख : मार्लेश्वर मार्गावरील आंगवली येथे बावनदीवर पोहायला गेलेले दोघेजण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. मोठ्या शोधकार्यानंतर दोघांचे मृतदेह शोधण्यात यश आले. सुजय अनिल घोगले (24), अमित अनिल माइन (22, दोघेही रा. हातीव गावकरवाडी) अशी मृतांची नावे आहेत. 

याबाबत देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सुजय आणि अमित हे दोघेही शनिवारी (ता. 5) दुपारी 12 वाजता मोटारसायकल घेऊन बाहेर गेले होते. यानंतर ते संध्याकाळपर्यंत परत न आल्याने त्यांचा शोध सुरू झाला. या वेळी काहींनी ते पोहायला गेले असतील अशा बेताने त्यांचा शोध सुरू केला. यानुसार आंगवली बावनदी पात्रातील विठाबाई-कासारकोळवण पुलाजवळ नदीशेजारी त्यांची मोटारसायकल व काही वस्तू दिसून आल्याने नदीत शोधमोहीम सुरू करण्यात आली. 

आज सकाळपर्यंत त्यांचा काहीही पत्ता न लागल्याने याची माहिती देवरूख पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. यानंतर मासे पकडणाऱ्या घोरपी बांधवांना शोधासाठी पाचारण करण्यात आले. या बांधवांना पहिला मृतदेह शोधण्यात 11.30 वाजता यश आले. याचवेळी देवरूखमधील राजू काकडे हेल्प ऍकॅडमीचे गणेश जंगम, अण्णा बेर्डे, राजा गायकवाड, दिलीप गुरव, चंद्रकांत भोसले, विशाल तळेकर, सिद्धू वेल्हाळ, निरंजन बेर्डे, प्रवीण परकर, वरद जंगम, पराग लिंबूकर, दीपक गेल्ये आदी घटनास्थळी पोचले. त्यांनीही शोधकार्य सुरू केले. दुपारी दीडच्या दरम्यान दुसरा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या वेळी हातीव आणि कासारकोळवण गावातील ग्रामस्थांनी शोधकार्यात मोठी मदत केली. 

मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. संध्याकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावकरवाडीवर शोककळा पसरली आहे. याची नोंद देवरूख पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास व्ही. डी. मावळणकर हे करत आहेत. 
 
स्वप्नं राहिली अपुरी 
अमित माइन याचा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स झाला होता. तो मुंबईतील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये कामाला होता. सध्या लॉकडाउनमुळे तो गावी आला होता. या क्षेत्रात त्याला नाव कमवायचे होते, तर सुजय हा कामासाठी दोन दिवसांनी मुंबईत जाणार होता. मोठी नोकरी करून तोही आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करणार होता. आजच्या घटनेने या दोघांची स्वप्ने अपुरी राहिली आहेत. 

हे पण वाचा -  पतीचा खून करून मृतदेह खड्यात गाडणाऱ्या पत्नीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

 
दोन भाऊही जाणार होते पोहायला 
आजच्या घटनेत मृत दोघे आणि त्यांचे दोन भाऊही त्यांच्यासोबत पोहायला जाणार होते; मात्र या दोघांना घाई लागल्याने ते पुढे निघून गेले. ही घटना घडल्यानंतर काही वेळातच ते दोघे भाऊ तिथे पोचले; मात्र फक्त मोटारसायकल दिसत होती. अमित आणि सुजयचा पत्ता नसल्याने त्यांना संशय आला. याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली. त्यानंतर शोधमोहीम सुरू झाली. 

हे पण वाचा - घरातील किरकोळ वादातून त्याने संपवले आयुष्यच!

 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two young boy dead in drawing river