चिपी विमानतळ पूर्णत्वाकडे ; आठ ते दहा दिवसांत विमान उतरणार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 January 2021

बहुतांश कामे पूर्णत्वाला गेली असून केंद्र सरकारच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत.

कुडाळ (सिंधुदुर्ग) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात भर टाकणाऱ्या चिपी विमानतळाची उभारणी पूर्ण झाली असून, येत्या आठ ते दहा दिवसांत विमानसेवेचा प्रारंभ होईल. बहुतांश कामे पूर्णत्वाला गेली असून केंद्र सरकारच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. आता कोणताही अडथळा नाही, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांसमवेत चिपी विमानतळाची पाहणी केली. 

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले, 'चिपी विमानतळाच्या तांत्रिक बाबी पूर्ण करू, या दृष्टिकोनातून आमची वाटचाल सुरू आहे. प्रत्येक माणसाला कशी सुरक्षितता मिळेल, या दृष्टीने निर्णय घेण्यात आले आहेत. येथे रस्ता सुशोभीकरणाबरोबर विमान येताना घ्यायची काळजी, पोलिस किती, सुरक्षा यंत्रणा किती सज्ज आदींबाबतचे नियोजन झाले आहे. केंद्र सरकारच्या आवश्‍यक परवानग्या घेण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्राने कोणत्याही प्रकारचे आडमुठे धोरण घेतलेले नाही. सांघिक प्रयत्नातून येत्या आठ ते दहा दिवसांत सिंधुदुर्ग विमानसेवेचा प्रारंभ होणार आहे.'

हेही वाचा - काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाबाबत सुरु असलेल्या चर्चेतील हवाच त्यांनी काढून घेतली 

खासदार राऊत म्हणाले, 'विमानतळाची बारकाईने तपासणी करण्यात आली आहे. उडान योजनेअंतर्गत चिपी ते मुंबई प्रवास आता प्रत्येकी अडीच हजार रुपयांमध्ये करता येईल. इतर कंपन्या हवाई वाहतूक करायला इच्छुक आहेत. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. चिपीचे विमानतळ इतरांना भुरळ घालेल, अशा स्वरूपाचे असणार आहे. हवाईमंत्री हरदीपसिंग पुरी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा केंद्र पातळीवर संपर्क सुरू आहे. 100 टक्‍के केंद्राचे सहकार्य मिळणार आहे. 

पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून राज्याने आपले काम पूर्ण केलेले आहेत. 20 लाख लीटर पाणी, 11 केव्ही वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे. रस्ता प्रस्तावाबाबत आमदार केसरकर व आमदार नाईक यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला आहे. रस्त्याची डागडुजी सुरू आहे. नामकरणाबाबत हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व बॅरिस्टर नाथ पै यांची नावे केंद्राकडे पाठवण्यात आली आहेत. यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होईल. इंटरनेट सेवा शंभर टक्के पूर्ण झालेली असून याबाबत कोणतीही समस्या नाही.'

यावेळी आमदार केसरकर म्हणाले, 'चिपी विमानतळ विकासाचे दालन असणार आहे. शिवाय या भागात असणाऱ्या किनाऱ्यांमुळे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे.' या वेळी संजय पडते, संदेश पारकर, सुनील डुबळे, रुची राऊत, आबा कोंडसकर आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला? हे उद्या मतपेटीतून पुढे येणार

 

फायर ब्रिगेड यंत्रणा कार्यान्वित 

विमानतळावर फायर ब्रिगेड यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. विमानतळ अत्याधुनिक होत असताना या ठिकाणी काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकी सात कोटींच्या फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या कार्यान्वित असल्याचे श्री. राऊत व श्री. सामंत यांनी सांगितले. 
 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uday samant is on sindhudurg tour for today chipi airport start 8 to 10 days in kudal