
महाड (जि. रायगड) - ‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊंसह थोर पुरुषांबाबत अवमानजनक आणि बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्यांना दहा वर्षांची शिक्षा व्हावी आणि त्यांना कुठलाही जामीन मिळू नये, असा कायदा करावा,’ अशी मागणी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी किल्ले रायगडाला आज भेट दिली. त्यावेळी उदयनराजे यांनी शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी सहा मागण्या केल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात उदयनराजे बोलत होते.
ते म्हणाले, की हल्ली छत्रपती शिवाजी महाराजांसह अन्य महापुरुषांचा पदोपदी अवमान केला जात आहे. म्हणूनच अवमानकारक व बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून दहा वर्षांची शिक्षा व्हावी आणि त्यांना जामीन मिळू नये, असा कायदा करावा. इतिहासावरून अनेकदा वाद, मतभेद निर्माण होतात. त्यामुळे असे प्रसंग टाळण्यासाठी सरकारमान्य इतिहास राज्य सरकारने प्रकाशित करावा.
‘चित्रपट स्वातंत्र्याच्या नावाखाली कादंबऱ्या व चित्रपटांत गैरसमज निर्माण करणारे प्रसंग दाखविले जातात. ते टाळण्यासाठी सेन्सॉर मंडळाची स्थापना करावी. रामायण सर्किट, बौद्ध सर्किटप्रमाणे शिवस्वराज्य सर्किटदेखील तयार करावा.
दावणगिरीमध्ये असलेल्या शहाजी महाराजांच्या समाधीच्या संवर्धनासाठी पुरेसा निधी देण्यात यावा, अशा मागण्या उदयनराजे यांनी केल्या. या मागण्यांवर शहा व देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
राजधानी दिल्लीत महाराजांचे स्मारक होत असले तरीही महाराष्ट्रात अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचे स्मारक होण्यात अडचण येत असल्यास राजभवनच्या बाजूला असलेल्या ४८ एकर जागेत हे स्मारक उभारावे.
- उदयनराजे, खासदार, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.