छत्री, रेनकोट विक्रेत्यांचा धंदा अजून मंदा; व्यापाऱ्यांना पावसाचे वेध

अमित गवळे 
रविवार, 9 जून 2019

पाली  : यंदा जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अजूनही कोणी छत्री, रेनकोट आणि ताडपत्री घेण्यासाठी बाहेर पडत नाही आहे. परिणामी हा व्यवसाय करणाऱ्यांचा धंदा मंदावला आहे. मोठी गुंतवणूक करून भरलेल्या मालाला उठाव नसल्याने हे व्यापारी धास्तावले आहेत. माल लवकर विकला जावा यासाठी ते पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत.

पाली  : यंदा जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अजूनही कोणी छत्री, रेनकोट आणि ताडपत्री घेण्यासाठी बाहेर पडत नाही आहे. परिणामी हा व्यवसाय करणाऱ्यांचा धंदा मंदावला आहे. मोठी गुंतवणूक करून भरलेल्या मालाला उठाव नसल्याने हे व्यापारी धास्तावले आहेत. माल लवकर विकला जावा यासाठी ते पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत.
 
हवामान खात्याने जिल्ह्यात पाऊस 14 जून नंतर दाखल होणार असल्याचे वर्तविले आहे. पाऊस आल्यावर अनेक लोक आपल्या घराच्या छपरावर किंवा ओटीवर लावण्यासाठी, इतर कामांसाठी ताडपत्री किंवा मेणकापड घेतात. पण अजून पाऊस नाही उन्हाचा तडाखा आहे. अशा वेळी ताडपत्री किंवा मेणकापड लावल्यास ते खराब होते. त्यामुळे कोणी ते खरेदी करत नाहीत. पाऊस उशिरा दाखल होणार असला तरी. अजून कुठेही वळवाच्या किंवा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे पावसाला अजून सावकाश असल्याने कोणीही छत्री किंवा रेनकोट घेण्यास देखील बाजारात बाहेर पडत नाही. मागील वर्षी या दिवसांपर्यंत चांगला धंदा झाला होता. मात्र यंदा पाऊस उशिरा असल्याने दुकानात भरून ठेवलेल्या मालाला फारसा उठाव नाही पैसे अडकून पडले आहेत. थोडा जरी पाऊस पडला असतात तर मालाला उठाव मिळाला असता. मग आणखी नवीन माल भरता आला असता असे पालीतील प्रशांत खैरे या व्यापाऱ्याने सकाळला सांगितले. 

बाजारात विविध रंगांच्या आणि आकारांच्या छत्र्या दाखल झाल्या आहेत. यंदा छत्र्यांच्या किंमतीत 20 ते 25 रुपयांनी वाढ झाली आहे. तर रेनकोटच्या किंमती देखील 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ताडपत्री व मेणकापडाच्या किमतींमध्येही किरकोळ वाढ झाली आहे.

''पाऊस लांबल्याने लोक खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत. पावसाचे वातावरण जरी झाले असते तरी ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडले असते. मात्र तशी परिस्थिती सध्या नाही. भरलेल्या मालाला 10 टक्के सुद्धा उठाव नाही, माल पडून आहे. पाऊस आला असता तर ग्राहक छत्र्या, रेनकोट व ताडपत्री घेण्यासाठी बाहेर पडले असते. मात्र यंदा पावसाला उशीर झाल्याने बाजारात शुकशुकाट आहे.''
 - संतोष ओसवाल, व्यापारी, पाली
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umbrella, raincoat business is down ; Traders are waiting for rain