
याकडे महामार्ग ठेकेदारासह महामार्ग विभागानेही दुर्लक्ष केले आहे.
महामार्ग चौपदरीकरणात प्रत्येक चार किलोमिटर अंतरावर नियमानुसार मिडलकट ठेवण्यात आले आहेत.
कणकवली (सिंधुदुर्ग) - मुंबई- गोवा महामार्ग अंतिम टप्प्यात असताना झाराप ते खारेपाटण या टप्प्यात अनेक ठिकाणी अनधिकृत मिडलकट ठेवण्यात आले आहेत. ते मिडलकट ओलांडून वाहने महामार्गावर आल्यानंतर सातत्याने जीवघेणे अपघात होत आहेत; मात्र याकडे महामार्ग ठेकेदारासह महामार्ग विभागानेही दुर्लक्ष केले आहे.
महामार्ग चौपदरीकरणात प्रत्येक चार किलोमिटर अंतरावर नियमानुसार मिडलकट ठेवण्यात आले आहेत.
ज्या ठिकाणी असे अधिकृत मिडलकट आहेत, तेथे सिग्नल यंत्रणा, महामार्गावर वाहने उभी करण्यासाठी, वळण्यासाठी पुरेशी जागा, महामार्गावर पट्टे मारणे आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. समोरून अर्धा ते एक किलोमिटर अंतरापर्यंतचे वाहन दिसेल अशाच ठिकाणी मिडलकट ठेवण्यात आले आहेत; मात्र याखेरीज महामार्गावर अनेक ठिकाणी अनधिकृत मिडलकट ठेवण्यात आल्याचे दिसते. त्याचा अंदाज वेगाने जाणाऱ्या वाहन चालकांना येत नाही. या मिडलकटवर अचानकपणे दुचाकी, रिक्षाचालक आल्यानंतर अपघाताचे प्रसंग घडत आहेत.
अपघातांची मालिका
गेल्या महिन्यात हुंबरट-साकेडी दरम्यानच्या अनधिकृत मिडलकटवरून महामार्ग ओलांडताना भरधाव मोटारीची रिक्षाला धडक बसली होती. गुरुवारी जानवली-बौद्धवाडी येथील मिडलकटवरून दुचाकी जाताना मोटारीची धडक बसली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून सहा वर्षांची मुलगी सुदैवाने बचावली. याच मिडलकटवर यापूर्वी अनेकदा अपघात झाले असून एका दुचाकीस्वाराचाही बळी गेला आहे.
...अन् होतात अपघात
महामार्ग चौपदरीकरण करताना त्या भागातील ग्रामपंचायती, पेट्रोलपंप, मंदिरे, वाड्यांना जाणारे रस्ते या ठिकाणी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रस्ता दुभाजकादरम्यान तात्पुरते मिडलकट ठेवले होते; मात्र आता चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आले तरीही हे तात्पुरते मिडलकट तसेच आहेत. यात अधिकृत मिडलकटचा वापर करण्याऐवजी तात्पुरत्या मिडलकटवरून वाहने वळवली जातात. मात्र त्याचा अंदाज समोरून येणाऱ्या वाहन चालकांना नसल्याने वारंवार अपघाताचे प्रकार घडत आहेत.
संपादन - राहुल पाटील