रत्नागिरीत 13 लाखापैकी 1,409 लोकांची चाचणी तर 247 जणांना सारीची बाधा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

सारीचे 247 रुग्ण सापडले. सर्दी, ताप, खोकला यासारखे आजार असलेले 1,751 रुग्ण आहेत. 

रत्नागिरी : 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील घरोघरी तपासणी मोहिमेचे काम 85 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. तपासणीत केलेल्या 13 लाख 5 हजार जणांपैकी 1,409 नागरिकांची कोविड चाचणी केली. त्यात 248 जणं बाधित सापडले असून 247 जणं सारीचे रुग्ण आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरोघरी जाऊन सर्व्हेक्षणाचे आदेश दिले आहेत. त्यासाठी विशेष मोहीम 15 सप्टेंबरपासून हाती घेतली आहे. 

हेही वाचा - दुधाची तहान ताकावर ; गरज सहाशे शिक्षकांची आणि उपलब्ध मात्र दहाच

ताप-सर्दीसह विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. जिल्ह्याची लोकसंख्या 15 लाख आहे. मोहीम सुरू झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेऊन आरोग्य विभागाच्या साडेसहाशे पथकांकडून कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत 13 लाख 5 हजार 50 जणांना भेट देऊन माहिती घेतली. यामध्ये सारीचे 247 रुग्ण सापडले. सर्दी, ताप, खोकला यासारखे आजार असलेले 1,751 रुग्ण आहेत. 

श्‍वसनाच्या आजारासह सर्दी, ताप असलेल्या 1,805 लोकांना कोरोना चाचणीसाठी पुढे पाठवले. त्यातील 1,409 जणांची कोविड तपासणी केली असून 249 रुग्ण बाधित सापडले. आरोग्य विभागाकडून तपासणी झालेल्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत कोरोना चाचणीयोग्य सापडलेल्या रुग्णांचा टक्‍का अत्यल्प आहे. त्यातही बाधित सापडणाऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. ग्रामीण भागात कोरोना कमी असून शहरी भागात रुग्ण आढळत आहेत. 

गेल्या आठ दिवसांमध्ये जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला आहे. गणेशोत्सवानंतर आरोग्य विभागाकडून अँटिजेन चाचण्यांचा धडाका लावत प्राथमिक पातळीवर असलेल्या कोरोनाशी निगडित रुग्णांवर उपचार केले. 

हेही वाचा - खेड तालुक्‍यात कोरोना अजूनही 88 गावांच्या वेशीबाहेरच 

पथकातील सदस्यांची चाचणी 

जिल्ह्यात 'माझे कुटुंब' मोहिमेसाठी आरोग्य विभागाकडून सुमारे दोन हजार कर्मचारी नियुक्‍त केले आहेत. त्या कर्मचाऱ्यांच्या तपासणीसाठी 67 प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटिजेन चाचणी कीट ठेवले आहे. शंभर कीट उपलब्ध असून कर्मचाऱ्यांनी आठ दिवसांनी ही चाचणी करून घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून दिल्या आहेत.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: under the policy of maza kutumba mazi jababdari in ratnagiri 13 lakh people checked under the policy