
मोफत बांधून मिळणाऱ्या भाजी मार्केटला नगरपंचायतमधील सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन विरोध का करत आहेत? असाही प्रश्न त्यांनी केला.
कणकवली (सिंधुदुर्ग) : राज्यातील एका नेत्याच्या दबावामुळेच भाजी मार्केटचे बांधकाम थांबविण्यासाठी नगरपंचायतीकडून नोटीस बजावली असल्याचा दावा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज केला. तसेच मोफत बांधून मिळणाऱ्या भाजी मार्केटला नगरपंचायतमधील सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन विरोध का करत आहेत? असाही प्रश्न त्यांनी केला.
येथील भाजप कार्यालयात श्री. तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी ग्लोबल असोसिएटला नगरपंचायतीने बजावलेल्या नोटिशीबाबत खुलासा केला. ते म्हणाले, भाजी मार्केट इमारतीचे बांधकाम थांबविण्याबाबत नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे; पण नोटिसांसारख्या धमक्यांना घाबरणारा मी नाही. मला नोटीस बजावण्यामागे राज्यातील सत्ताधारी एका नेत्याचा हात आहे. त्याशिवाय मुख्याधिकारी नोटीस काढू शकत नाहीत.
हेही वाचा - तातडीने निर्णय व्हावेत ; कलम ३२१ च्या अंतर्गत दिलेल्या नोटीसींवर अखेर सुनावणी
वस्तुतः १७ हजार चौरस फुटाचे बांधकाम आणि साडेपाच कोटी रुपये किंमतीचे भाजी मार्केट नगरपंचायतीला मोफत बांधून देण्याचा पहिलाच उपक्रम कणकवलीत पूर्णत्वास नेत आहोत; मात्र त्याचे नगरपंचायतमधील सत्ताधारी-विरोधकांना वावडे का? विरोध करण्यासाठी नगरपंचायतीमधील सत्ताधारी विरोधक एकत्र आले. किंबहुना सत्ताधारी-विरोधक एकत्र येण्यासाठी मी निमित्त ठरलो ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. मार्केट नको असेल तर सत्ताधाऱ्यांचे काय करायचे याचा विचार जनताच केल्याशिवाय राहणार नाही.
...तर सत्तेचा गैरवापर
जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. राज्यशासनाने विद्यमान संचालक मंडळाला आजवर तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. त्याचा फायदा घेत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी १०० हून अधिक उमेदवारांना जिल्हा बॅंकेत तात्पुरती नोकरी मिळवून दिली आहे. तसेच जिल्हा बॅंक निवडणुकीत बॅंक मतदार ठरविण्यासाठी सोसायट्यांना केवळ पाच दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यामध्येही राज्य सरकारकडून दबाव आणला जात आहे. या सर्व प्रकाराविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही श्री.तेली म्हणाले.
हेही वाचा - शेतकऱ्यांना वेळेत ऊस तोड करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे
संपादन - स्नेहल कदम