esakal | विनामास्क लोकांवर कारवाईचा बडगा
sakal

बोलून बातमी शोधा

unmasked people Action sawantwadi konkan sindhudurg

राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढत आहे. मुंबई, पुण्यामध्ये नव्याने रुग्ण सापडत असल्याने पुन्हा एकदा मास्क सक्तीचे करण्यात आले आहे.

विनामास्क लोकांवर कारवाईचा बडगा

sakal_logo
By
रुपेश हिराप

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनाचा पुन्हा एकदा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारी म्हणून येथील पालिकेकडून आजच्या आठवडा बाजारात दाखल झालेल्या व्यापाऱ्यांसह खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना मास्क सक्तीचे करत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यासाठी पोलिसांनाही स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली असून पोलिस पथकाकडून आठवडा बाजारावर चोख देखरेख ठेवण्यात आली आहे. 

राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढत आहे. मुंबई, पुण्यामध्ये नव्याने रुग्ण सापडत असल्याने पुन्हा एकदा मास्क सक्तीचे करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी मास्कबाबत प्रशासन तसेच पोलिस यंत्रणेला सूचना करीत विनामास्क आढळणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर सावंतवाडी शहरामध्ये पालिका आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. खुद्द नगराध्यक्ष संजू परब तसेच आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनीही रस्त्यावर उतरत मास्क वापरण्याबाबत अनेकांना आवाहन केले होते.

असे असतानाही आजही मास्क न वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शहरात मंगळवारच्या आठवडा बाजारासाठी आज घाटमाथ्यावरून दाखल झालेल्या व्यापाऱ्यांनीही मास्क न वापरल्याचे निदर्शनास आले. याची दखल तत्काळ पालिकेने घेत पोलिस यंत्रणेला स्वतंत्र कारवाईची सूचना केली. त्यानंतर पोलिसांकडून व्यापाऱ्यांसह खरेदीसाठी दाखल झालेल्या ग्रामीण तसेच शहरातील नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे अनेकांची एकच धांदल उडाली. यावेळी अनेकांना दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागले. 

मास्क वापरण्याचे आवाहन 
पोलिस उपनिरीक्षक स्वाती यादव यांच्यासह हवालदार ड्युमिंग डिसोजा, वाहतूक पोलिस प्रवीण सापळे, सखाराम भोई आदींनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी संपूर्ण बाजारपेठेवर लक्ष ठेवताना उपनिरीक्षक यादव यांनी व्यापारी वर्गासह खरेदीसाठी आलेल्या सर्वांना मास्क वापरण्याबाबत आवाहन केले. मास्क न वापरणाऱ्यांना मास्क खरेदी करून ते वापरण्यास भाग पाडले. 

संपादन - राहुल पाटील