अवकाळीचा कहर; समुद्रातही वादळ | kokan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवकाळीचा कहर; समुद्रातही वादळ

अवकाळीचा कहर; समुद्रातही वादळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी : जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. आजही जिल्ह्याच्या बहुतांश भागाला विजांच्या लखलखाटासह अवकाळीने झोडपून काढले. सततच्या पावसामुळे नाचणीला कोंब फुटले असून, आंबा व काजूला आलेला मोहोर काळवंडला आहे. आणखी दोन ते तीन दिवस अवकाळीचे संकट राहील, असा हवामान खात्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे.

गेल्या १५-२० दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण आणि दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस असा अवकाळीचा दिनक्रम बनला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी एकपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सावंतवाडी, कुडाळ, वैभववाडी यांसह अन्य तालुक्यांत जोरदार पाऊस पडत होता.

हेही वाचा: नागपूर : दक्षिण भारतातील पावसाने संत्र्याचे भाव कोसळले

सावंतवाडी परिसराला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले. वैभववाडीतही मुसळधार पाऊस झाला. ढगाळ वातावरण आणि सतत पडत असलेला पाऊस यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांतील नाचणी पिकांची काढणी रखडली. अनेक ठिकाणी नाचणी पीक भुईसपाट झाले आहे. पावसामुळे पिकाला कोंब आले असून, उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. अवकाळीमुळे आंबा, काजू पीक संकटात सापडले. आंबा, काजू पिकांना काही भागात मोहोर आला होता; परंतु हा मोहोर आता काळवंडू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण दिसून येते.

फवारण्या वाया

आंबा, काजू बागायतदारांनी पालवी आणि मोहोरावर कीटकनाशकाच्या फवारण्या केल्या होत्या; परंतु या फवारण्या सततच्या पावसामुळे वाया गेल्या आहेत. सध्या वातावरणामुळे कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यातच रोजच्या पावसामुळे शेतकऱ्यांना फवारणी करणेही शक्य होत नाही. त्यामुळे नेमके काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

loading image
go to top