राजकीय पोळी भाजण्यासाठी नाणारचा वापर; बशीर मुर्तुझा यांची टिका

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 December 2020

बहुसंख्य लोकांना जर तो प्रकल्प हवा असेल तर माझी पण त्याला सहमती आहे, असे आमदार साळवी यांनी आपले मत मांडले होते. त्यामध्ये ते काही चुकीचे बोलले नाही. लोकशाहीमध्ये बहुसंख्य लोकांना जे हवे असते तेच आपण करायचे असते, असे मुर्तुझा यांनी सांगितले.

रत्नागिरी - राजापूर तालुक्‍यामध्ये येणारा नाणार प्रकल्प बहुसंख्य लोकांना हवा असेल तर तो नक्की यावा, असे आमदार राजन साळवी यांनी मत प्रदर्शित केले. हे मत बरोबर असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुझा यांनी केले. आमदार साळवी यांच्या वक्तव्याचा वापर काही लोक राजकीय पोळी भाजण्यासाठी करीत आहेत, असे त्यांनी सांगितले. 

बहुसंख्य लोकांना जर तो प्रकल्प हवा असेल तर माझी पण त्याला सहमती आहे, असे आमदार साळवी यांनी आपले मत मांडले होते. त्यामध्ये ते काही चुकीचे बोलले नाही. लोकशाहीमध्ये बहुसंख्य लोकांना जे हवे असते तेच आपण करायचे असते, असे मुर्तुझा यांनी सांगितले.

राजापूर तालुक्‍यामध्ये येणाऱ्या नाणार प्रकल्पाला सुरवातीला लोकांचा विरोध होता तेव्हा त्यांनी लोकांची बाजू घेतली असेल परंतु आज त्यांना देखील कळते आहे की, आजच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी अनेक जमीनदार असतील तसेच त्या ठिकाणचे स्थानिक असतील या सर्वांना नाणार प्रकल्प हवा आहे. प्रकल्प होण्यासाठी मत मांडणारी अनेक सुशिक्षित नागरिक भेटत आहेत. मग त्यामध्ये वकील असतील, व्यापारीवर्ग असेल, कामगार, शेतकरी, जमीनदार असेल असे सर्वच लोक म्हणत आहेत की, आम्हांला प्रकल्प हवा आहे, याकडे मुर्तुझा यानी लक्ष वेधले. 

नाणार प्रकल्पामधून 55 हजार लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. या नाणार प्रकल्पामुळे फक्त रोजगार नव्हे तर नाणार प्रकल्प हा रिफायनरी प्रकल्प आहे आणि रिफायनरी प्रकल्प होणे ही देशाची एक मोठी गरज आहे. यांच्यामध्ये देशासाठीसुद्धा आपण हातभार लावणार आहोत, हा सुद्धा एक विचार लोकांच्या मनात असणे गरजेचा आहे, असे मत मुर्तुझा यांनी व्यक्त केले. 

अंधश्रद्धेतूनसुद्धा लोकांवर दबाव 
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर्वीपासूनच एखादा उद्योग यायचा ठरला की, येथील लोकांमध्ये अफवा पसरवण्याचे काम सुरू होते आणि लोकांना घाबरविले जाते. काही अंधश्रद्धेतूनसुद्धा लोकांवर दबाव आणला जातो. त्यामुळे येथील लोक घाबरून जातात, भांबावून जातात आणि त्या येणाऱ्या उद्योगाला ते विरोध करतात. परंतु त्यांना हे कळत नाही की ते आपल्याच पायावर दगड मारून घेत आहेत, असेही मत मुर्तुझा यांनी मांडले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: use of nanar for political purposes Criticism of Bashir Murtuza