esakal | गुहागरला लसीकरण केंद्रात पहिल्याच दिवशी गोंधळ

बोलून बातमी शोधा

गुहागरला लसीकरण केंद्रात पहिल्याच दिवशी गोंधळ
गुहागरला लसीकरण केंद्रात पहिल्याच दिवशी गोंधळ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गुहागर : 18 ते 44 वयोगटातील लसीकरणावेळी गुहागरच्या केंद्रात गोंधळ निर्माण झाला होता. 45 वरील काही ग्रामस्थांना लस दिल्यानंतर अचानक उर्वरितांना लस नाकारण्यात आली. सदरचे डोस वेगळे असल्याचे तक्रार निवारण केंद्रातून सांगितल्यामुळे गोंधळात अधिक भर पडली; मात्र गटविकास अधिकारी अमोल भोसले व वैद्यकीय अधिकारी डॉ. बळवंत लसीकरणस्थळी पोचले. उपस्थितांच्या शंकाचे समाधान केले. त्यानंतर लसीकरण केंद्रातील कामकाज सुरळीत झाले.

गुहागर शहरातील जि. प. शाळा क्र. 1 मध्ये 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला सुरवात झाली. कोविन ऍपवर नोंदणी केलेल्या 200 जणांना लस देण्याचे आजचे नियोजन होते. सकाळी लसीकरणाला सुरवात झाली. त्या वेळी ऑनलाइन नोंदणी केलेल्या काही व्यक्तींनाही लस देण्यात आली. ज्या वेळी एक वयोवृद्ध आजी लस घ्यायला आल्या. त्या वेळी तेथील परिचारिका मालप यांच्या लक्षात आले की, आजची लस केवळ 44 वर्षाखालील नागरिकांना द्यायची आहे. त्यांनी आजींना लस देण्याचे नाकारले. तसेच बाहेर लसीकरणासाठी जमलेल्यांना सूचना केली की, वय वर्षे 44 खालील व्यक्तींनाच लस दिली जाईल. या सूचनेनंतर एकच गोंधळ उडाला. उपस्थितांचे म्हणणे होते की, आम्ही ऑनलाइन नोंदणी केली आहे. आम्हाला आजची वेळ ऍपवर आली आहे.

हेही वाचा: परीक्षेला सुट्टी, शाळेला बुट्टी; मुलांची मानसिकता बिघडतेय

या प्रकारानंतर काहींनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चरके, प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथील अधिकाऱ्यांकडे, तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार केली. या केंद्रातील एकाने 18 ते 44 वयोगटासाठी वेगळी लस असल्याचे सांगितले. त्यामुळे आणखी गोंधळ उडाला. 44 वर्षावरील लस घेतलेल्या व्यक्तींनी मग आम्हाला काही होणार नाही ना, अशी विचारणा केली. अखेर वैद्यकीय अधिकारी डॉ. बळवंत आणि गटविकास अधिकारी अमोल भोसले लसीकरण केंद्रात आले. त्यांनी कोविन ऍपवर सुरवातीला चुकीची नोंदणी झाली आहे. 2 ते 8 मे या कालावधीत गुहागर लसीकरण केंद्रावर केवळ 18 ते 44 वयोगटातील ग्रामस्थांचेच लसीकरण केले जाईल. लसीचे वेगळे प्रकार नाहीत. केंद्र शासन 45 वर्षावरील नागरिकांसाठी लस पुरवत आहे. तर 18 ते 44 वयोगटासाठी लसीचे वितरण राज्य शासनाकडून होत आहे, असे स्पष्ट केले. त्यानंतर लसीकरण पुन्हा सुरळीत सुरू झाले.