esakal | परीक्षेला सुट्टी, शाळेला बुट्टी; मुलांची मानसिकता बिघडतेय
sakal

बोलून बातमी शोधा

परीक्षेला सुट्टी, शाळेला बुट्टी; मुलांची मानसिकता बिघडतेय

परीक्षेला सुट्टी, शाळेला बुट्टी; मुलांची मानसिकता बिघडतेय

sakal_logo
By
धर्मवीर पाटील

इस्लामपूर : कोव्हिड आपत्तीमुळे आकस्मित परीक्षा पुढे ढकलण्याचा व परीक्षा रद्दचा शासनाकडून घेण्यात आलेला निर्णय मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम करणारा आहे. अभ्यास व शैक्षणिक प्रवाहापासून दूर चाललेल्या मुलांचे मानसिक स्वास्थ्य हरवत असून परीक्षा रद्द होऊन अनपेक्षितपणे विनाकष्ट प्रमोशन मिळाल्यामुळे मुलांमध्ये इंटरनेट व मोबाईलच्या अती आहारी जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

कोव्हिडच्या अनिश्चिततेचा सर्वाधिक विपरीत परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सलग दोन वर्षे शैक्षणिक वातावरण, खेळ, परिक्षा, मित्र, उपक्रम अशा गोष्टींपासून मूले दूर आहेत. मुलांच्या जीवनातील प्रत्येक वर्ष हे वाढ व विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. मुलांच्या विकासाला मर्यादा घातली गेल्यास त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो. मुलं वरकरणी हसून खेळून वागत असली तरी त्यांच्या मनावर काय परिणाम झाला आहे हे शारीरिक अस्वस्थतेतून दिसून येत असतं.

हेही वाचा: इस्लामपुरात मंगळवारपासून कडक जनता कर्फ्यु!

आपत्तीमुळे भीती, असुरक्षितता, अगतिकता अशा भावना मनात निर्माण होतात. या भावना मुलं शब्दांतून, बोलण्यातून व्यक्त करतीलच असं नाही. त्यामुळेच मुलांच्या मानसिकतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यासाठी मानसतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक विचार व्हावा असे अनेक मानसतज्ज्ञांचे मत आहे. सांगली जिल्ह्यात 'शुश्रुषा' सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेच्या मानसतज्ज्ञांनी कोव्हिडच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा प्रशासनवतीने पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलांचा केलेला सर्व्हे महत्त्वाचा आहे. मानसिक, भावनिक, वर्तणूक, शैक्षणिक समस्या असणाऱ्या मुलांमधील विविध मानसिक व मनोसामाजिक लक्षणांचा शोध घेतला गेला. त्यामध्ये ८५ टक्के मुलांमध्ये चिडचिडेपणा, ५७ टक्के मुलांमध्ये राग व अतीसंताप, ५२ टक्के मुलांमध्ये भुकेच्या तक्रारी तर ५१ टक्के मुलांमध्ये सर्वाधिक अतीचंचलतेचे प्रमाण आढळले आहे.

कोव्हिड आपत्तीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा कुटुबांतील सर्व घटकांप्रमाणे मुलांच्या वर्तनावरही विपरीत परिणाम झाला आहे. मुलांमध्ये अकारण भीती, वारंवार रडणे, कमी झोप, इतर मुलांमध्ये न मिसळणे, अंथरूण ओले करणे, अंगठा चोखणे, नखे खाणे, बोलताना अडखळणे, हात पाय थरथरणे, अकारण डोके व पोटदुखी अशा अनेक भावनिक, मनोशारीरिक तक्रारीरोबरच चिडचिडेपणा, अतीचंचलता, राग व अतीसंताप, एकाग्रतेचा अभाव व लक्षात न राहण्याच्या सर्वाधिक जास्त समस्या दिसून आल्या आहेत. मुलांमधील या भावनिक, वर्तणूक व मनोसामाजिक समस्यांचे योग्यवेळी शास्त्रीय निराकरण न झाल्यास त्यांच्या मानसिकतेबरोबरच शिक्षण,आरोग्य, व समाज वर्तनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: केरळची प्रगती एलडीएफ करेल; सुळेंनी शुभेच्छा देत व्यक्त केला विश्वास

"कोव्हिड आपत्तीमध्ये मुलाच्या शरिरिक आरोग्यातकेच मुलांच्या मानसिक व भावनिक विकासाला अधिक महत्व द्यायला हवे. ऑनलाईन शिक्षणातून मुलांच्या डोक्यात केवळ माहितीचा साठा वाढेल. कागदावरची परीक्षा रद्द झाली तरी जीवनकौशल्यावर आधारित परीक्षा घ्यावी."

- डॉ. संदीप सिसोदे, अध्यक्ष, राज्य मानसतज्ञ असोसिएशन

"मुलांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी शासनाने मानसतज्ज्ञांच्या मदतीने शास्त्रीय उपाययोजना करावी. योग्यवेळी निराकरण न झाल्यास भविष्यात मुलांचे खूप मोठे आणि भरून न येणारे नुकसान होईल."

- कालिदास पाटील, कार्याध्यक्ष, राज्य मानसतज्ञ असोसिएशन.

loading image