दोन्‍ही गटांच्‍या मच्छीमारांना भडकावण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 March 2019

निवडणुकीच्या तोंडावर राणेंकडून पर्ससीनधारक व पारंपरिक मच्छीमार यांना भडकावून दोघांच्याही मतांवर डोळा ठेवून राजकारण केले जात आहे. ही बाब मच्छीमारांना ज्ञात आहे. जिल्ह्यापुरता मर्यादित असलेला त्यांचा पक्ष मच्छीमारांचे प्रश्‍न सोडवू शकत नाही, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

मालवण - पारंपरिक मच्छीमारांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. ती संधी साधत गेल्या पाच वर्षांत पर्ससीननेटच्या मासेमारीवर बंदी आणली. ‘एलईडी’च्या मासेमारीवरही कडक कारवाईचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या तोंडावर राणेंकडून पर्ससीनधारक व पारंपरिक मच्छीमार यांना भडकावून दोघांच्याही मतांवर डोळा ठेवून राजकारण केले जात आहे. ही बाब मच्छीमारांना ज्ञात आहे. जिल्ह्यापुरता मर्यादित असलेला त्यांचा पक्ष मच्छीमारांचे प्रश्‍न सोडवू शकत नाही, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

श्री. नाईक म्हणाले, ‘‘पर्ससीननेटच्या मासेमारीला बंदीबाबत मी विधानसभेत अधिसूचना जाहीर करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री, एकनाथ खडसे यांच्याकडे मागणी लावून धरल्यानंतर पर्ससीनच्या मासेमारीवर बंदी आणण्यात आली.

सोमवंशी समितीचा अहवाल मान्य करून २०१५-१६ मध्ये अधिसूचना काढण्यात आली. अनधिकृत पर्ससीनच्या नौका पकडून त्यांच्यावर मोठ्या रकमेची दंडात्मक कारवाईही करण्यात आली. सध्या एलईडी मासेमारीचा त्रास मच्छीमारांना होत आहे. या पार्श्‍वभूमीवर या मासेमारीवर कडक कारवाई व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मत्स्य खात्याला विशेष अधिकार देण्याची कार्यवाही सुरू आहे. स्वाभिमान पक्षाकडून पारंपरिक आणि पर्ससीनधारक मच्छीमारांना भडकावण्याचे काम सुरू आहे. या दोन्ही मच्छीमारांच्या मतांवर डोळा ठेवून त्यांचे सध्या राजकारण सुरू आहे. मात्र, हे सर्व मच्छीमारांना ज्ञात आहे. त्यामुळे त्यांच्या या भूलथापांना मच्छीमार बळी पडणार नाहीत.’’

ते म्हणाले, ‘‘गेल्या २५ वर्षांत जे मच्छीमारांना संरक्षण मिळाले नाही, ते गेल्या साडेचार वर्षांत आम्ही मिळवून दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारंपरिक मच्छीमारांच्या पाठिशी आहेत. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्‍न येत्या काळात निश्‍चितच सुटतील. एलईडी मासेमारीसंदर्भात कायद्याच्या कडक अंमलबजावणीचा देशव्यापी निर्णय हा शासनाला घ्यावा लागेल. या प्रश्‍नासंदर्भात मच्छीमारांची भेट घेत कडक कारवाई व्हावी, यासाठी आमची आग्रही भूमिका राहील.’’

या वेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख जोगी, महेश देसाई, किरण वाळके, गणेश कुडाळकर, अक्षय रेवंडकर यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

एकत्रित प्रचाराचा भाजपकडून शब्द
येत्या ३० तारखेला शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विनायक राऊत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. निवडणुकीसाठी एकत्रित प्रचार करण्याचा शब्द भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिला आहे. त्यामुळे अर्ज दाखल करताना शिवसेना-भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने रत्नागिरी येथे जाणार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत जसे एकत्रित काम केले तसेच एकत्र काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या असून, सक्षम पंतप्रधान, सक्षम खासदार यावरच मतदारसंघात मते मागणार असल्याचेही श्री. नाईक यांनी सांगितले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaibhav Naik comment