नाणारप्रमाणे एलईडी मासेमारी हद्‌दपार करणार - वैभव नाईक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

मालवण - कोकण किनारपट्टीवर एलईडी मासेमारीच्या विरोधात कडक कारवाईस सुरवात झाली आहे. नाणार प्रमाणेच एलईडी लाईटची मासेमारी हद्दपार करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. हा प्रश्‍न ठाकरेच सोडवू शकतात. त्यामुळे मच्छीमारांनी बहिष्कार मागे घेत मतदानात भाग घ्यावा असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी येथे पत्रकार परिषदेत केले. 

मालवण - कोकण किनारपट्टीवर एलईडी मासेमारीच्या विरोधात कडक कारवाईस सुरवात झाली आहे. नाणार प्रमाणेच एलईडी लाईटची मासेमारी हद्दपार करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. हा प्रश्‍न ठाकरेच सोडवू शकतात. त्यामुळे मच्छीमारांनी बहिष्कार मागे घेत मतदानात भाग घ्यावा असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी येथे पत्रकार परिषदेत केले. 

तालुका शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बा. बी जोगी, पंकज सादये, गणेश कुडाळकर, नंदू गवंडी, महेश देसाई, अमित भोगले, दर्शन म्हाडगुत यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

आमदार नाईक म्हणाले, एलईडीच्या मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या समस्येसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन यांचे लक्ष वेधल्यानंतर कोकण किनारपट्टी भागात मत्स्यव्यवसाय विभागाच्यावतीने धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. जे एलईडी ट्रॉलर्स पकडण्यात आले त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. नाणारमधील रिफायनरी प्रकल्प रद्द झाला. त्याप्रमाणे एलईडी मासेमारी हद्दपार केली जाईल. एलईडी मासेमारीचा प्रश्न ठाकरेच सोडवू शकतात असा विश्वास मच्छीमारांना आहे. त्यामुळे मच्छीमार शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

कोळंब पुलाचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून येत्या 1 मे पासून कोळंब पूल पूर्ववत सुरू होणार आहे. या पुलाचे काम लवकर होऊ नये यासाठी विरोधकांनी बरेच प्रयत्न केले. कसाल- मालवण रस्त्याचे काम सुरू झाले आहे. निवडणुकीनंतर किनाऱ्यावरील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे कामही सुरू होणार आहे.

शहरातील भुयारी गटार, भूमिगत वीज वाहिन्यांचे काम देखील लवकरच सुरू होणार आहे. गेल्या 25 वर्षात नारायण राणे, आमदार नीतेश राणेंनी कोणत्या योजना पूर्ण केल्या? असा प्रश्न आमदार नाईक यांनी यावेळी उपस्थित केला.

मागील निवडणुकीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल पाहता शिवसेना- भाजपचा आलेख हा वाढता राहिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत युतीचे उमेदवार विनायक राऊत यांना मोठे मताधिक्‍य मिळेल असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaibhav Naik comment