आरोग्य अधिकाऱ्याविरोधात वैभववाडीत विनयभंगाचा गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

पोलिसांनी डॉ. पाटीलविरोधात आज विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

वैभववाडी - तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील याच्याविरोधात आज विनयभंगाचा गुन्हा नोंद केला. एका महिला डॉक्‍टरने याबाबत काल रात्री येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेले तीन महिने त्या डॉक्‍टरने अश्‍लील मेसेज पाठवून हैराण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभागात खळबळ माजली आहे. 

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः तालुक्‍यात ग्रामीण भागात संबंधित महिला डॉक्‍टर रुजू झाली. तालुका आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. पाटील कार्यरत आहे. रुजू झाल्यापासून त्यांचा डॉ. पाटीलशी संपर्क येत होता. कार्यालयीन कामानिमित्ताने संवाद होत होता; परंतु काही दिवसांनंतर डॉ. पाटीलने त्यांच्या मोबाईलला गुड मॉर्निंग, गुड नाईट मेसेज पाठविण्यास सुरवात केली. महिला डॉक्‍टरला त्यात वावगे वाटले नाही; परंतु त्यानंतर डॉ. पाटीलने अश्‍लील मेसेज पाठविण्यास सुरवात केली. पहिलाच मेसेज आल्यानंतर त्यांनी त्याला असे मेसेज पाठवू नका, असे सुनावले. आपले वरिष्ठ आहेत म्हणून त्या महिलेने त्याकडे थोडेसे दुर्लक्ष केले; मात्र तो त्या महिला डॉक्‍टरला फोन करून चहा प्यायला घरी ये; मला मॅगी बनवून दे, चहा दे अशी मागणी करू लागला. कार्यालयात बोलवून आपण गोव्याला फिरायला जाऊया, असे म्हणत अनेकदा लगट करण्याचा प्रयत्न केला. महिला डॉक्‍टर ऐकत नसल्याचे लक्षात येताच त्याने तिला कार्यालयीन कामानिमित्ताने त्रास देणे सुरू केले. अश्‍लील मेसेजचा सिलसिला सुरू ठेवला. त्या महिलेने बुधवार (ता.30) रात्री उशिरा पोलिस ठाण्यात डॉ. पाटीलविरोधात 24 एप्रिल ते 14 जुलै या कालावधीत विनयभंग केल्याची फिर्याद दिली. 

हे पण वाचाकोरोनासाठी धोका ठरणाऱ्या कोमॉर्बिड आजाराचे रत्नागिरीत प्रमाण जास्त

 

पोलिसांनी डॉ. पाटीलविरोधात आज विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार छाया शिंगारे तपास करीत आहेत. 

 
यापूर्वीही तक्रार अर्ज 
तालुका आरोग्य अधिकाऱ्याविरोधात यापूर्वी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सचिन बरगे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. आपल्यावर पाळत ठेवण्याचे काम डॉ. उमेश पाटील करीत असल्याचे तक्रार अर्जात म्हटले होते.  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaibhavwadi molestation case against health officer