esakal | कोकणात काळ्या तिळाचे होणार संशोधन
sakal

बोलून बातमी शोधा

varieties of black sesame developed in konkan with the help of agricultural university in ratnagiri

कृषी विद्यापीठाने घेतली दखल; नव्याने संशोधन होणार, शेतकऱ्यांचा प्रतिसाद 

कोकणात काळ्या तिळाचे होणार संशोधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दाभोळ : कोकणातील शेतकऱ्यांना कमी मेहनत, कमी कालावधीत व अत्यल्प खर्चातून जास्त उत्पन्न देणारी तिळाची शेती सध्या दापोली, मंडणगड तालुक्‍यातून दुर्मिळ होत चालली आहे. मात्र कोकणातील मातीत भरभरून उत्पन्न देणाऱ्या या काळ्या तिळाचे वाण नव्याने विकसित करण्याकडे कोकण कृषी विद्यापीठाने लक्ष द्यावे, या शेतकऱ्यांच्या मागणीला विद्यापीठाने सकारात्मक प्रतिसाद दिलाय.

हेही वाच - बेड नाही, ऑक्‍सिजन नाही, एचआरसीटीसाठी मात्र भरमसाट शुल्क
 
खरीप हंगामात पेरलेला काळा तीळ भाद्रपद, आश्विन महिन्यात पिवळ्याधमक रंगाच्या सौंदर्याने सारा परिसर बहरून टाकतो. आता हीच तिळाची शेती दुर्मिळ होत चालली आहे. या काळ्या तिळाचे बियाणे वाचविण्यासाठी तसेच यावर कोकण कृषी विद्यापीठाने नव्याने संशोधन करण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दापोली व मंडणगड तालुक्‍यातील डोंगर उतारासह पठारावर काळ्या तिळाची शेती फुलली की, पिवळ्याधमक रंग परिसराचे आकर्षण ठरत असे. मात्र आता हीच तिळाची शेती दापोली मंडणगडातून हद्दपार होत चालली आहे. 

खरीप हंगामात डोंगर उतारावर, पठारावर एक दोनदा नांगरणी करून तीळ पेरला की ना बेणणी करावी लागत, ना खताची मात्रा द्यावी लागत, ना कीटकनाशकांची फवारणी करावी लागत. अशा या पिकाची पिवळीधमक फुलं झाडावरच सुकली की ती फुले कापून अंगणात आणावयाची आणि झोडून काळं सोनं टिपायचं, अशी जुन्या शेतकऱ्यांची पद्धत होती. पूर्वीच्या काळात या काळ्या तिळाचे तेल गावातीलच घाण्यातून काढले जात असे. हे तेल स्वयंपाकात वापरले जात असे तर पेंड गुरांना खायला घातली जात असे. 

हेही वाच -  बिबट्याची हुलकावणी ; बारा दिवसांनंतरही पिंजरा रिकामाच 

"दापोली मंडणगड तालुक्‍यातील काळे तीळ पिकविणाऱ्या शेतकऱ्यांकडे कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ जातील व या शेतकऱ्यांकडून या पिकासंदर्भात माहिती घेऊन ते वापरत असलेल्या काळ्या तिळाचे बियाणे जतनासाठी तसेच या बियाण्याला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळवून देण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ प्रयत्न करेल."

- डॉ. पराग हळदणकर, संशोधन संचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली 

दृष्टिक्षेपात
 
- तिळाची शेती दापोली, मंडणगडातून हद्दपारीकडे 
- कोकणातील हवामान उत्पादनास पोषक 
- काळ्या तिळाची शेती कमी खर्चातील 
- काळे सोने औषधी गुणधर्माचे 
- तिळाच्या तेलाचा वापर जेवणातही 

संपादन - स्नेहल कदम