बिबट्याची हुलकावणी ; बारा दिवसांनंतरही पिंजरा रिकामाच

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

परंतु अद्यापही त्या पिंजऱ्यात असलेल्या भक्ष्याकडे दुर्लक्षित करून वनविभागाला हुलकावणी देत आहे.

पावस ( रत्नागिरी ) : रत्नागिरी तालुक्‍यातील मेर्वी परिसरात बिबट्याने चौघांवर हल्ला केल्यानंतर वनविभाग बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कॅमेरे व पिंजऱ्याच्या माध्यमातून गेले बारा दिवस विशेष प्रयत्न करीत असून अद्यापही त्यांना यश येऊ शकलेले नाही.

गेली दोन वर्षे सातत्याने बिबट्याचे माणसे व प्राण्यांवर हल्ले होत आहेत. त्याप्रमाणे यापूर्वी वनविभागातर्फे अनेक प्रयत्न झाले. ते फोल ठरले. यापूर्वी कुर्धे येथे एका विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडले होते. परंतु वनविभागाला त्याला वर काढण्यात यश आले नाही. अखेर त्याने विहिरीत लावलेल्या शिडीद्वारे रातोरात पळ काढला होता. त्यानंतर मेर्वी येथे बिबट्याची पिल्ले एका घरात घुसली होती. परंतु वनविभागाने त्या बिबट्याची आपत्ती नको, याकरिता त्या पिल्लांना जंगलात सोडले होते. यावर्षी चौघांवर हल्ला केल्यानंतर वनविभाग पथकाच्या माध्यमातून त्याच्यामागे ससेमिरा लावल्यामुळे त्याने आपला मार्ग बदलून अन्य भागातून आपले भ्रमण करीत असल्याचे दृष्टीस पडत आहे. 

हेही वाचा - कोकणात कमी होत चाललेली पिके लागलीत बहरायला 

सध्या पावस, नाखरे आदी भागात बिबट्याचा संचार सुरू आहे. त्यामुळे वनविभाग अनेक ठिकाणी पिंजरे लावून त्यात पकडण्याकरिता प्रयत्नशील आहे. परंतु अद्यापही त्या पिंजऱ्यात असलेल्या भक्ष्याकडे दुर्लक्षित करून वनविभागाला हुलकावणी देत आहे. वनविभागातर्फे नागरिकांना ध्वनीक्षेपकावरून नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत. तसेच पंचक्रोशीत रस्त्याशेजारी फलक लावून जागृती होत आहे. या परिसरात आत्तापर्यंत तीन ते चार बिबट्यांचे अपघाती मृत्यू झाले आहेत; मात्र एकदाच फासकीत अडकलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात यश आले आहे. वारंवार हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेले नाही.

ठळक बाबी

- पिंजऱ्यातील भक्ष्याकडे बिबट्याचे दुर्लक्ष
- पावस, नाखरे आदी भागात संचार
- मार्ग बदलून अन्य भागातून भ्रमण

हेही वाचा -  जठारांनी रिफायनरीवर बोलतच राहावे : उदय सामंत 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard not found in konkan area till 12 days the forest officers try to found him