Forest Fire : वणवा पेटतो...... धडकी भरवतो..!

दिवसागणिक मोठ्याप्रमाणात विविध जातींच्या झाडांची कोकणामध्ये लागवड होत आहे. उन्हाळ्यामध्ये विविध कारणांनी अचानकपणे जंगलांना आगी वा वणवे लागण्याच्या घटना दरवर्षी घडत आहेत.
Forest Fire
Forest Firesakal

विविध नैसर्गिक साधन-संपदेने नटलेल्या कोकणचा वारसा लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध जातीच्या दुर्मिळ अन् औषधी वनस्पतींसह वन्यप्राणी, पक्षी यांचे जंगलराजीमध्ये वास्तव्य आहे. राज्य शासनाने रत्नागिरी जिल्ह्याला फलोत्पादन जिल्हा म्हणून घोषित केल्याचा फायदा घेत येथील शेतकर्‍यांनी मोठ्याप्रमाणात आंबा, काजू, नारळी, कोकम यांच्या बागा विकसित केल्या आहेत.

दिवसागणिक मोठ्याप्रमाणात विविध जातींच्या झाडांची कोकणामध्ये लागवड होत आहे. उन्हाळ्यामध्ये विविध कारणांनी अचानकपणे जंगलांना आगी वा वणवे लागण्याच्या घटना दरवर्षी घडत आहेत. बहुतांश वणवे हे मानवनिर्मित असल्याचे सांगितले जात आहे.

वणवे लागू नयेत वा ते लागण्याचे टाळण्यासाठी उपाययोजना करणे केवळ प्रशासनाचे काम नसून त्याच्या जोडीला लोकसहभागही महत्वाचा आहे. अन्यथा, भविष्यामध्ये दुर्मिळ वनसंपदा वणव्यात जळून भस्मसात होताना नैसर्गिक जीवनसाखळी धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

जंगल वाचवण्याचे आव्हान; लोकसहभागही महत्वाचा

डिसेंबरनंतर वणवे हे कोकणाचे दरवर्षीचे चित्र आहे. उन्हाच्या तीव्रतेबरोबर डोंगरांना वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. कारवाई व उपाययोजनाअभावी दुर्मिळ वनसंपदेसह खाजगी व सार्वजनीक संपत्तीचे लाखोंचे नुकसान होते. लाखों हेक्टरचे क्षेत्र यात नष्ट झाले आहे. ऐन हंगामात आंबा, काजूला याचा फार मोठा फटका बसत आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी झाडे, औषधी वनस्पती, लहान पक्षी, प्राणी पडतात. ऐन हंगामात आंबा, काजू तसेच रानमेव्याची मोहरलेली झाडे होरपळली जात असल्याने आर्थिक फटका बसून मोठे नुकसान होते.

कोकणातील सद्य परिस्थितीत आंबा, काजू व अन्य फळबाग लागवड परिसरात एक ते पाच मीटर रुंदीचा जाळ पट्टा म्हणजे तेवढ्या जागेतील गवत जाळून लागलेला वणवा बागेत येणार नाही याची काळजी घेणे, गवत काढणे, झाडांच्या परिसरात साफसफाई ठेवणे अशा प्राथमिक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

तसेच विजेच्या खांबांखालील परिसर काळजीपूर्वक जाळून घेणे त्यामुळे होणाऱ्या स्पार्क किंवा ठिणगी मुळे आग लागणार नाही. मात्र हे सर्व बिंबवण्यासाठी संबंधित वन विभाग यांनी मार्गदर्शन उपक्रम राबविणे आवश्यक आहे, तसेच सामाजिक, शेतकरी संघटना यांनी देखील या कार्यात हातभार लावून जनजागृती करणे गरजेचे आहे. पारंपारिक भाजावळ पद्धत बंद करून आधुनिक शेतीचे महत्व बिंबवले पाहिजे.

असे लागतात वणवे......

पोषक हवामान आणि जमिनीचा आधार घेत येथील अनेक शेतकर्‍यांनी विविध प्रकारच्या बागा विकसित केल्या आहेत. या बागांमधील झाडांच्या सुरशिक्षततेसाठी संबंधित शेतकर्‍यांकडून या बागेच्या कपाऊंडच्या बाहेरून (या प्रकाराला काही भागामध्ये ‘ईत’ काढणे असे म्हणतात.) जाणूनबुजून आग लावली जाते.

लावण्यात आलेली आग काहीवेळा आटोक्यात राहत राहत नसल्याने तिचा भडका उडून वणवा पसरतो. जनावरांना वैरण वा अन्य काही कारणांसाठी आवश्यक असलेले गवत काढून झाल्यानंतर सडा मोकळा करण्याच्या उद्देशाने काहीवेळा सड्यावरील गवत जाळले जाते. त्यासाठीही आग लावली जाते. तर, काहीवेळा काही लोक जाणूनबुजून वणवे लावतात.

वन्यजीव आणि दुर्मिळ वनस्पती होतात नष्ट

सह्याद्रीच्या रांगामध्ये वसलेल्या विविध दुर्मिळ वनस्पती आणि वन्यप्राण्यांचे मोठ्याप्रमाणात वास्तव्य आहे. विशिष्ट हंगामांमध्ये अन्य भागातील वन्यजीव सह्याद्रीच्या रांगातील घनदाट जंगलामध्ये स्थलांतर करून आश्रयाला येतात. अचानकपणे लागणार्‍या या वणव्यामध्ये मोठमोठी विस्तारित असलेली जंगलेच्या जंगले जळून नष्ट होतात. त्यामध्ये दुर्मिळ झाडे आणि छोटे-मोठे वन्यप्राणीही जळून मरून जातात. एकंदरीत, या वणव्यांमध्ये जंगलेच नष्ट होत असल्याने वन्यजीवांच्या आश्रयस्थानालाच धोका निर्माण होतो.

बागांना अधिक धोका

बहुतांश शेतकर्‍यांच्या आंबा-काजूच्या बागा घरापासून वा लोकवस्तीपासून काही किमी. दूर अंतरावर असलेल्या सड्यावरील जागांमध्ये विकसित केलेल्या असतात. या बागा घरापासून दूर असल्याने अचानकपणे लागणार्‍या वणवा बागेमध्ये पोहोचण्यापूर्वी त्या ठिकाणी संबंधित शेतकर्‍यांना शक्य होत नाही.

त्यामुळे वणव्यापासून बागेची सरंक्षण करण्याची संधी शेतकर्‍याला मिळत नाही. काहीवेळा तर, वणव्याचा वेग आणि भडका एवढा मोठा असतो की बागेमध्ये संरक्षणासाठी ठेवण्यात आलेल्या कामगारांनाही वणवा रोखणे शक्य होत नाही.

वन्यप्राण्यांच्या वावरामुळे लोकवस्तीला धोका

वणव्यांमध्येच जंगलेच्या जंगले नष्ट होत असल्याने वन्यप्राण्यांनी नेमके राहायचे कुठे? असा प्रश्‍न निर्माण होतो. जंगलेच नष्ट झाल्याने वन्यप्राण्यांची एकप्रकारे जीवन साखळीच तुटून त्याच्यातून त्यांच्या जगण्याचाच प्रश्‍न निर्माण होतो. त्यातून वन्यप्राणी भक्ष्यासाठी लोकवस्तीमध्ये घुसण्याच्या अनेक घटना घडत आहेत. भक्ष्य पकडताना लोकांनी केलेल्या अडथळ्यातून त्यांच्यावर या वन्यप्राण्यांनी हल्ला करण्याच्याही घटना घडत आहेत. वन्यप्राण्यांच्या या वाढत्या वावरामुळे लोकवस्तीला धोकाच निर्माण झाला आहे.

वृक्षलागवड मोहिमेचा फार्स नको....

पर्यावरणाचा ढासळेला तोल सावरण्यासाठी शासनाने विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणारी ग्राम समृद्धी योजना, झाडे लावा- झाडे वाचवा यांसारख्या योजनांचा समावेश होतो. या योजनांमध्ये मोठ्याप्रमाणात दरवर्षी वृक्ष लागवड केली जाते.

मात्र, काहीवेळा ही वृक्षलागवडीची मोहीम केवळ फार्स होताना दिसत आहे. कागदोपत्री लागवड झालेल्या या रोपांचे वृक्षामध्ये रूपांतर होण्यासाठी आवश्यक असलेले विशेष लक्ष दिले जात नाही. त्यामुळे ही वृक्षलागवड केवळ कागदोपत्रीच दिसत आहे.

नुकसानीचा पंचनामा केवळ फार्स

वणव्यामध्ये आग लागून झालेल्या आंबा-काजूच्या बागांच्या होत असलेल्या नुकसानीचा संबंधित गावच्या तलाठ्यामार्फत पंचनामा केला जातो. त्याचा अहवाल ते तहसीलदार कार्यालयाला सादर करतात. झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई मिळण्याच्या अनुषंगाने हा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी तालुका कृषी विभागाला सादर केला जातो.

आपत्तीमध्ये होणारी नुकसानीची शासनाकडून नुकसानभरपाई दिली जाते. मात्र, वणव्यामध्ये होणार्‍या नुकसानीची नुकसानभरपाई दिली जात नाही. त्यामुळे नुकसानीचे प्रशासनामार्फत होणारे पंचनामे केवळ फार्सच ठरत आहेत. जर, पंचनामे केवळ फार्सच ठरणार असतील तर, त्या करण्यासाठी वेळेचा अपव्यय का केला जातो ?

वणव्यात बागायतदारांच्या स्वप्नांची राखरांगोळी

रत्नागिरी जिल्ह्याला राज्य शासनाने फलोत्पादन जिल्हा म्हणून घोषित केला आहे. त्याचा लाभ घेत येथील शेतकर्‍यांनी मोठ्याप्रमाणात आंबा, काजू, नारळी यांच्या बागा विकसित केल्या आहेत. दिवसागणिक मोठ्याप्रमाणात विविध जातींच्या झाडांची लागवड होवून वर्षानुवर्षे पडीक असलेले जमिन ओलिताखाली येत आहेत.

मात्र, उन्हाळ्यामध्ये विविध कारणांनी अचानकपणे लाणार्‍या वणव्यांमध्ये शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने विकसित केलेल्या बागा जळून त्यामध्ये मोठे नुकसान होत आहे. मात्र, बागायतींची होणारी ही नुकसान भरपाई देण्यामध्ये शासनाकडून काहीसे हात आखडते घेतले जात आहेत. त्यातून वणव्यामध्ये बागायतदारांच्या स्वप्नाची राखरांगोळी होत आहे.

महत्वपूर्ण जाळरेषा

एका ठिकाणी लागलेला वणवा जास्त ठिकाणी पसरत जाऊ नये म्हणून वनविभामार्फत काही उपाययोजना केल्या जातात. त्यामध्ये लागलेला वणवा पसरू नये म्हणून वनविभागाकडून एका ठिकाणी आधीच आग लावून तो भाग जाळून ‘जाळरेषा’ तयार केली जाते. जेणेकरून त्याद्वारे वणवा पसरण्यापासून रोखला जातो.वणवा लावणार्‍याच्या विरोधात वनविभागाकडून गुन्हा नोंद होतो.

जंगलाला आग लावणार्‍यास भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 26 नुसार नुकसानी किंमत आणि पाच हजार रूपये दंड व दोन वर्षे कारावासाची शिक्षा दिली जात आहे. मात्र, अनेकवेळा आग लावणारी व्यक्तीचे नाव उघड होत नाही वा पुढे येत नाही. त्यामुळे आग लावणार्‍या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यामध्ये तांत्रिक अडचणी येताना दिसतात.

वणव्यांमुळे होणारी हानी

  • जनावरांसाठीचा चारा आगीत भस्मसात

  • नवीन येणारी रोपे, दुर्मिळ, औषधी वनस्पती खाक

  • पक्ष्यांची घरटी, सरपटणारे प्राणी, किटक जळून नष्ट

  • वन्यप्राणी, पक्षी, दुर्मिळ जीव यांचे अधिवास नष्ट

  • जंगल नष्ट होत असल्याने वन्यप्राण्यांचे स्थलांतर

  • गावात उतरून शेतशिवाराचे वन्यप्राण्यांकडून नुकसान

  • गवताचे आच्छादन नष्ट झाल्याने जमिनीची धूप वाढते

वणवे लागण्याची कारणे

  • जमीन सपाटीकरणासाठी आग लावणे

  • बागांसभोवताली ईत काढताना वणवा लागणे

  • सरपण गोळा करण्यासाठी आग लावली जाते

वणवे रोखण्यासाठी घ्यावयाची दक्षता

  • वनातअग्निजन्य वस्तूंची हाताळणी सावधानतेने

  • सिगारेट, बीडीची थोटके जंगलात फेकू नयेत

  • शेतामध्ये रान वा बांध जाळताना दक्षता घ्यावी

  • वणवाविरोधी स्वयंसेवी पथकांची स्थापना करावी

  • स्थानिक पातळीवर जनप्रबोधनाची आवश्यकता

भूजल पुनर्भरणाला फटका

वणव्यामध्ये स्थानिक वनस्पती, वन्यजीव, अनेक वर्षांचे जुने मोठे वृक्ष, वेली, झुडूपं, गवत आणि त्यांच्या बिया या आगीत जळून राख होतात. गवताळ जमिनीवरील किंवा झाडांवरील असंख्य पक्षी, सस्तन प्राणी, सरीसृप, उभयचर व त्यांची अंडी/पिल्लं ही होरपळून मृत्युमुखी पडतात. यातील काही प्रदेशनिष्ठ प्रजाती (endemic species) या फक्त त्याच प्रदेशात आढळत असल्याने त्यांच्या अस्तित्वावर संकट येते.

आगीमुळे जमिनीच्या वरच्या थरातील उपयुक्त जीवाणू नष्ट झाल्यास ती जमीन नापीक बनते व तेथे नवीन वनस्पतींची वाढ होऊ शकत नाही. भाजल्यामुळे टणक झालेल्या वनजमिनीत पावसाचे पाणी न मुरता वाहून गेल्याने भूजलाचे पुनर्भरण होणे मुश्किल होऊन जाते. अशा प्रकारे अनियंत्रित आगीमुळे एखादी परिसंस्था पुर्णपणे कोलमडून पडू शकते. 

वणव्याने तापमान वाढीमध्ये पडतेय भर

वणव्याच्या धुरातून हवेत मिसळणारे कार्बनडाय ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साइड असे वायू वातावरणात आधीच अतिरिक्त प्रमाणात असलेल्या हरितगृह वायूंमध्ये भर घालतात. त्यातून तापमानवाढीच्या दुष्टचकराला काहीशी चालना मिळते. या धुरात असलेले वोलाटाईल ऑरगॅनिक कंपाउंडस (VOC) आणि नायट्रस ऑक्साईड्स (NOC) हे वायू वातावरणाच्या सर्वात खालच्या ट्रोपोस्फियर या थरातील ओझोनचे प्रमाण धोक्याच्या पातळीपर्यंत वाढवितात. खूप मोठ्या वणव्यामुळे निर्माण होणारे 'पायरोक्यूम्युलस' नावाचे विशिष्ट ढग त्या प्रदेशातील वादळं आणि वीज कोसळणे यांचं प्रमाण वाढविण्यास सहाय्यभूत ठरतात. 

शासनाच्या योजनांचा लाभ घेत फळबाग लागवड केली जात आहे. मात्र, त्याला वणव्यांपासून धोका निर्माण झाला आहे. वणव्यांपासून फळबागांचे संरक्षण करण्याची शेतकर्‍यांची जशी गरज आहे तसे शासनाने शेतकर्‍यांच्या होणार्‍या नुकसानीचा विचार करून नुकसानभरपाई द्यावी.

- मनोहर गुरव, शेतकरी

जंगल संपदेला धोका निर्माण करणारे वणवे रोखण्यासाठी वनविभागाकडून गोवागावी लोकांशी विविध उपक्रमांच्या माध्यमातून संवाद साधीत जनप्रबोधन केले जात आहे. त्यामध्ये काही सामाजिक संस्था वा वन्यप्रेमींकडूनही वनविभागाला सहकार्य मिळत आहे. वनविभागाकडे तुलनात्मकदृष्ट्या अपुरे मनुष्यबळ असतानाही वनविभाग निश्‍चितच वणवे रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे.

- प्रकाश सुतार, वनपरिक्षेत्र अधिकारी

निसर्गसंपदेचे जतन आणि संवर्धन करण्याची ग्रामस्थ, प्रशासन आणि शासन आदीं सर्वांची निश्‍चितच जबाबदारी आहे. वणवे रोखण्यासाठी तयार केलेल्या कायद्यांचीही अंमलबजावणी करण्यामध्ये तांत्रिक अडचणी असल्या तरी त्यावर उपाययोजना शोधणे गरजेचे आहे. वणव्यांपासून बागांचे संरक्षण व्हावे म्हणून शेतकरी, बागायतदारांकडून बागेसभोवती काही भागातील जंगलतोड वा अन्य उपाययोजनांसाठी खर्च केला जातो. त्याचाही शासनाकडून सहानूभूतीपूर्वक विचार होणे गरजेचे आहे.

- योगेश नकाशे, माजी सरपंच

निसर्गाचा समतोल ढासळवणारे वणवे रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध स्तरांवर जनजागृतीची आवश्यकता आहे. शासनासह विविध संस्थांनी ‘वणवामुक्त गाव योजना’ अशा स्वरूपाचा कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. ‘आमचा गाव, वणवामुक्त गाव’ अंतर्गत गावात फलक जागृती, स्वतंत्र ग्रामसभा, त्यात वणवा रोखणे, वृक्षवल्ली अभियान, वृक्ष संवर्धन याबाबत मार्गदर्शन, त्यासाठी कृतीदल स्थापना, स्थानिक युवकांना वणवा विझवण्याचे प्रशिक्षण, वणवाविरोधी पथक आदी विविध पर्याय वापरले जायला हवेत.

- प्रतीक मोरे, पर्यावरण अभ्यासक

मंडणगड तालुक्याचा जंगल परिसर हा वन्य प्राण्यांचा आवास आहे. वन्यजीव याच ठिकाणी वावरत असतात. मात्र वणव्यात त्यांचे अधिवास जळून जात असल्याने दुर्मिळ वन्यजीव नामशेष होवू लागले आहेत. तसेच त्यांचा मानवी वस्तीकडे ओढा वाढला आहे. फळबाग लागवड धारक शेतकरी वणव्यात होणाऱ्या नुकसानीमुळे पूर्णपणे नाउमेद होत आहे. यावर त्वरित जागृती व प्रतिबंधक कारवाई व्हायला हवी.

- समीर पारधी, प्रगतिशील शेतकरी, तुळशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com