मालवणात विक्रेत्यांच्या स्थलांतरास अखेर स्थगिती

प्रशांत हिंदळेकर
Monday, 21 September 2020

बाजारपेठ येथील फळ व भाजी विक्रेते यांनी आज नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या.

मालवण (सिंधुदुर्ग) - बाजारपेठेतील भाजी व फळ विक्रेत्यांना मामा वरेकर नाट्यगृह येथे स्थलांतरित करण्याबाबत सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या निर्णयाला नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी रविवारी स्थगिती दिली. त्यामुळे व्यथा मांडण्यास आलेल्या विक्रेत्यांच्या शिष्टमंडळास आधार मिळाला. 

बाजारपेठ येथील फळ व भाजी विक्रेते यांनी आज नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. त्याठिकाणी व्यवसाय होणार नाही, हा अनुभव आहे. त्यामुळे मामा वरेरकर परिसर याठिकाणी बसण्यास विक्रेत्यांनी असहमती दर्शवली. त्यापेक्षा महिनाभर सगळेच बंद ठेवा; मात्र स्थलांतरित करू नका. अशी भूमिका विक्रेत्यांनी मांडली. त्यावेळी नगराध्यक्षांनी स्थलांतर निर्णयाला स्थगिती दिली. या बैठकीदरम्यान मुख्याधिकारी जयंत जावडेकर हेही उपस्थित होते. बाजारात भाजी व फळ विक्री मुळेच गर्दी होते का? मासे बाजारात गर्दी असते. मासे लिलावाच्या ठिकाणी गर्दी असते. असेही भाजी विक्रेत्यांनी सांगत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले असता. मासे लिलाव धारक यांचीही बैठक घेऊन सूचना देण्यात आल्याचे नगराध्यक्ष यांनी सांगितले. 

शहरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा विचार करता. गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने बाजारपेठ येथील फळे व भाजी विक्रेते यांना उद्यापासून (ता.21) काही दिवस मामा वररेकर नाट्यगृह परिसरात विक्री करण्याबाबत निर्णय सर्व नगरसेवक उपस्थितीत बैठकीत घेण्यात आला होता. आता तुम्हा विक्रेत्यांचा त्या ठिकाणी बसण्यास विरोध असेल तर मी नगराध्यक्ष या नात्याने स्थलांतर निर्णयाला तात्पुरती स्थगिती देतो. पुन्हा सर्व नगरसेवक बैठक बोलावून त्यावेळी भाजी-फळ विक्रेते यांना बोलावून स्थलांतर बाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत बाजारपेठ येथेच आहे त्या ठिकाणी विक्रेत्यांनी व्यवसाय करावा. मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर या नियमांचे पालन प्रत्येकाने करावे. अन्यथा नियमानुसार कारवाई केली जाईल. असे प्रशासनाने स्पष्ट केले. 

नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा 
बाजारपेठेत आम्ही भाजी, फळ विक्रेते नियमांचे पालन करत आहोत. यापुढेही अधिक काटेकोर पालन करू. मात्र जे कोणी नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करा. प्रशासनाने केलेल्या कारवाईला आमचा विरोध असणार नाही; मात्र आहे त्याच ठिकाणी व्यवसाय करू द्या, असे विक्रेत्यांनी स्पष्ट केले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vegetable sellers issue malvan konkan sindhudurg