....तर आम्ही आंदोलन करु

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

कामगारांना एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) : एसटी कर्मचाऱ्यांचा संपूर्ण पगार गणपतीच्या अगोदर न दिल्यास कामगार एकत्र येऊन या एसटी प्रशासनाला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आता एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. प्रसंगी काम बंद आंदोलनही पुकारू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण राज्यपरिवहन कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष जे. डी. ऊर्फ बनी नाडकर्णी यांनी पत्रकातून दिला आहे.

हेही वाचा - रत्नागिरीतील 330 शिक्षक जाणार आता परजिल्ह्यात...

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की सध्या कोरोनामुळे एसटी महामंडळाला जबर फटका बसला आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांचे हाल दयनीय असून आता त्यांना कोणीच वाली नाही.
एसटी महामंडळाची सुत्र सध्या शिवसेनेकडे आहे. वाहतूक मंत्रालय तसेच सत्ताही त्यांच्याकडेच आहे. अशी परिस्थिती असतानाही सध्याच्या परिवहन मंत्र्याला एसटीच्या कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या मुलाबाळांच्या सुख - दुःखाची काहीच पर्वा नाही. अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली व वेळोवेळी जीव धोक्‍यात घालून एसटी कर्मचाऱ्यांनी सेवा दिली आहे. 

आज जेव्हा त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांचा जगण्या-मरण्याचा प्रसंग आला तेव्हा परिवहनमंत्र्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली, हे निंदनीय आहे. कोरोना काळातही कुठलीही पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या गावात पोहचवण्याची व्यवस्था केली. तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक कर्मचारी आज रस्त्यावर बसून नाईलाजास्तव भाजीपाल्याचा व्यवसाय व इतर व्यवसाय करत आहेत. शिवसेना सत्तेवर आल्यावर व परिवहन मंत्र्यांकडे सूत्रे येताच अनेक कर्मचारी आशेने त्यांच्या संघटनेत दाखल झाले; पण आज कर्मचारी रस्त्यावर आले. 

महाराष्ट्र नवनिर्माण राज्यपरिवहन कामगार सेना सोडली तर कुठल्याच संघटनेने कामगारांसाठी काहीही केले नाही. खोटी आश्‍वासने देवून कामगारांचे शोषणच केले, असे नाडकर्णी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - खवय्ये काढणार कोरोनाचा काटा..

सरकारला इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण राज्यपरिवहन कामगार सेनाचा महाराष्ट्र उपाध्यक्ष या नात्याने सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करतो, की ही वेळ कामगारांच्या अस्तित्वाची आहे. आता नाही तर कधीच नाही, अशी गंभीर स्थिती आज कामगारांवर ओढवली आहे. कामगारांना एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. संपुर्ण पगार गणेशोत्सवाच्या आधी दिला नाही तर एकत्र येऊन एसटी प्रशासनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही व काम बंद आंदोलनही पुकारले जाईल. तेव्हाच या झोपलेल्या सरकारला जाग येईल, असा इशारा दिला आहे.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vice chairman of maharashtra state road transport announce movement against government in sindhudurg