Vidhan Sabha 2019 : राजापुरात आघाडीकडून कुणबी कार्डची खेळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

राजापूर - राजापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीतर्फे नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांना उमेदवारी जाहीर झाली. या मतदारसंघामध्ये मोठ्यासंख्येने कुणबी समाज असून लाड हे कुणबी समाजाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यारूपाने कुणबी समाजाच्या व्यक्तीला उमेदवारी देवून कुणबी कार्डच्या साथीला मतदारसंघातील आघाडीच्या ताकदीची जोड देत कॉंग्रेस आघाडीने शिवसेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याला दोन दिवस शिल्लक असताना राजापूर विधानसभा मतदारसंघातील आघाडीच्या जागा वाटपाचा आणि उमेदवारीचा तिढा सुटला आहे.  संपूर्ण राजापूर आणि लांजा तालुका तर, संगमेश्‍वर तालुक्‍यातील साखरपा जिल्हा परिषद मतदारसंघ असा विस्तारलेल्या राजापूर - लांजा मतदारसंघात विविध जाती - धर्माच्या लोकांसमवेत सुमारे सत्तर टक्‍क्‍याहून अधिक कुणबी समाज आहे. त्यामुळे अन्य समाजाच्या तुलनेत कुणबी व्होट बॅंक जास्त आहे. लाड हे बहुसंख्येने असलेल्या कुणबी समाजातील असून त्यांनी गेल्या वर्षभरापासून मतदारसंघाशी संपर्क वाढविला आहे. कुणबी मेळाव्यांना उपस्थित राहून त्याद्वारे कुणबी ज्ञातीबांधवांना सहकार्याची साद दिली आहे. त्यातच, नुकत्याच पार पडलेल्या कुणबी मेळाव्यामध्ये उमेदवार म्हणून समाजाला संधी मिळावी, अशी एकमुखी मागणीही करण्यात आली होती.

या साऱ्याचा लाड यांना निवडणुकीमध्ये फायदा होणार आहे. या मतदारसंघामध्ये कॉंग्रेसआघाडीची स्वतंत्र व्होटबॅंक असून तिचीही साथ त्यांना होणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. 

आज अर्ज दाखल 
दरम्यान, काँग्रेस आघाडीचे उमेदवार श्री. लाड उद्या (ता.3) सकाळी 10 वा. उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी काँग्रेसकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. 
 
चुरशीमध्ये लाड यांनी बाजी मारली 
आघाडीच्या मित्रपक्षांमधील जागा वाटपामध्ये राजापूर मतदारसंघ काँग्रेसकडे कायम आहे. असे असले तरी, काँग्रेसमधील इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार, याची साऱ्यांना उत्सुकता होती. त्यामध्ये नवी मुंबईचे माजी उपमहापौर लाड आणि स्थानिक नेतृत्व म्हणून परिचित असलेले, गेल्या साडेचार वर्षाहून अधिक काळ विविध माध्यमांद्वारे मतदारसंघाच्या संपर्कात असलेले अजित यशवंतराव यांच्यामध्ये जोरदार चुरस होती. या चुरशीमध्ये लाड यांनी बाजी मारली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Avinash Lad contestant from congress NCP