Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्र्यांनी कोकणात शिवसेनेवर टाळली टिका

राजेश सरकारे
Tuesday, 15 October 2019

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टिका टाळत मोठ्या खुबीने कोकणच्या विकासाला आपल्या भाषणात ‘फोकस’ केले. नीतेश राणे यांच्या आक्रमकतेचे कौतुक करण्याबरोबरच संयमाचे धडेही दिले. तर राणेंनी भावनिक आवाहन करूनही, त्यांच्या राजकीय वाटचालीबाबतचे बोलणे मुख्यमंत्र्यांनी टाळले.

कणकवली - मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टिका टाळत मोठ्या खुबीने कोकणच्या विकासाला आपल्या भाषणात ‘फोकस’ केले. नीतेश राणे यांच्या आक्रमकतेचे कौतुक करण्याबरोबरच संयमाचे धडेही दिले. तर राणेंनी भावनिक आवाहन करूनही, त्यांच्या राजकीय वाटचालीबाबतचे बोलणे मुख्यमंत्र्यांनी टाळले.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जिल्ह्यात मोठी सभा होत असल्याने ते काय बोलणार याबाबत कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांना उत्सुकता होती. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर कोणतीही टीका न करता थेट कोकण विकासाच्या मुद्दयावर भाष्य केले.

त्यानंतर विविध आक्रमक आंदोलनांमुळे राज्यासह देशात गाजलेल्या आमदार नीतेश राणेंना संयमाची शिकवणी दिली. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशामुळे ते भविष्यात मंत्री होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती; मात्र त्याअनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी राणेंवर कोणतेही थेट भाष्य न करता, नीतेश राणेंचे नेतृत्व पुढे येईल असे सांगत त्यांनी नारायण राणेंनाही सूचक संकेतही दिले.

राज्यात भाजपची मंडळी स्वबळावर निवडणूक लढविण्यास उत्सुक असताना देखील मुख्यमंत्र्यांनी युतीसाठी आग्रही भूमिका घेतली होती. आजच्या प्रचार सभेतही त्यांनी राज्यात महायुतीचेच सरकार येईल, असा विश्‍वास व्यक्त केला. युतीच्या उमेदवारांना तगडा प्रतिस्पर्धी नसल्याने सांगत त्यांनी कणकवलीसह कुठल्याच मतदारसंघात चुरस नाही असे स्पष्ट केले; मात्र नीतेश राणे हे 65 ते 70 टक्के मते घेतील आणि प्रतिस्पर्धी चारी मुंड्या चीत होतील असे सांगून त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला.

माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनीही संयमित भाषण करताना शिवसेनेवर कोणतीही टीका केली नाही; मात्र आता काही मिळविण्यासारखे राहिलेले नाही उर्वरित आयुष्य कोकणच्या विकासासाठी सार्थकी लागावे यासाठी भाजपमध्ये आल्याचे सांगत राणेंनी संयमी भाषण केले. आपल्या अनुभवाचा फायदा भाजपनेही घ्यावा अशीही अपेक्षा व्यक्त केली.

राणेंच्या या अपेक्षेवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राणेंच्या मागील 20 वर्षातील कारकिर्दीचा आढावा घेतला. त्यांच्या विधीमंडळातील कामाचे कौतुक केले. राणेंच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचाही फायदा भाजपला होईल असे ते म्हणाले. पण मंत्रीमंडळात नारायण राणेंना स्थान मिळणार का? याविषयी बोलणे त्यांनी खुबीने टाळले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 CM avoids comment on Shiv Sena in Konkan