Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री म्हणतात, 'नितेश राणेंना आमच्या शाळेत संयम शिकवू' 

टीम ई-सकाळ
Tuesday, 15 October 2019

खासदार नारायण राणे यांचे पूत्र नितेश यांच्या प्रचारासाठी आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येथे जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंसह नितेश यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. नितेश यांना आक्रमकतेसोबत संयम शिकवू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कणकवली : खासदार नारायण राणे यांचे पूत्र नितेश यांच्या प्रचारासाठी आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येथे जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंसह नितेश यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. नितेश यांना आक्रमकतेसोबत संयम शिकवू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शिवसेनेची बंडखोरांवर कारवाई; चौदा जणांची हकालपट्टी

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? 
मुख्यमंत्री म्हणाले, 'निवडणुकीत कोठेही चुरस दिसत नाही. स्वतःला मोठे समजत नाही. छोट्यातल्या छोट्या मुलाला विचारलं तरी तो  भाजप-शिवसेनेची सत्ता येईल, असे सांगेल. कणकवलीत 65 ते 70 टक्के मते नितेश राणे यांना मिळतील. ही निवडणूक शांतपणे लढवायला हवी. काही लोकं आपल्याला चिथवण्याचा प्रयत्न करतील. आपण जिंकणारे आहोत. त्यामुळं मोठ्या मनानं याठिकाणी काम करू. काँग्रेस-राष्ट्रवादीची आजची अवस्था काय आहे.? त्यांचे नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभा झाल्या. त्यात त्यांनी लोकसभेतील भाषणांची री ओढली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणी थांबायला तयार नाही. 'इस दिल के तुकडे हजार तुकडे हुये कोई इथर गिरा कोई उधर गिरा', अशी राष्ट्रवादीची अवस्था आहे.' मुख्यमंत्री म्हणाले, 'नितेश राणे यांनी विधानसभेत अतिशय आक्रमकपणे काम केलं आहे. त्यांचं काम मी जवळून पाहिलंय. ते कोकणासाठी कणकवलीसाठी झटत आहेत. ते नारायण राणेंच्या शाळेत तयार झाल्याने आक्रमक आहेत. आता आमच्या शाळेतील संयम त्यांना शिकवायचा आहे. म्हणजे, आक्रमण आणि संयम यातून ते नारायण राणेंसारखेच तयार होतील.'

झाडे तोडणाऱ्यांना पुणेकर 21 ऑक्टोबरला उत्तर देतील

स्वाभिमान अखेर विलीन
नारायण राणे सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाचा प्रश्नच नव्हता, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राणेंच्या भाजप प्रवेशावर खुलासा केला. ते म्हणाले, 'नारायण राणे भाजपचेच आहेत. त्यानंतर नितेश यांनी प्रवेश केला. आज, निलेश आणि स्वाभिमानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या अनुमतीने स्वाभिमान भाजपमध्ये विलीन झाल्याची घोषणा करतो. राणेंचा स्वाभिमान परिवार आज, आमचा झाला. याचा मला आनंद आहे.'

मुख्यमंत्र्यांची सभा शिवसेनेला धक्का
शिवसेनेने राणे यांचे चिरंजीव नितेश यांना आव्हान दिल्यानंतर मुख्यमंत्री कणकवलीत नितेश यांच्यासाठी सभा घेणार की नाही, यावरून उलट-सुटल चर्चा होती. पण, आज, अखेर मुख्यमंत्र्यांनी कणकवलीत जाहीर सभा घेतल्यानं शिवसेनाला धक्का बसल्याचं मानलं जातंय. 

राणेंच्या निवासस्थानी चहापान 
दरम्यान, सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टरने कणकवलीत आगमन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या निवासस्थानी चहापान केले. त्यानंतर नारायण राणेंसह मुख्यमंत्री सभास्थळी आले. त्यावेळी माजी खासदार नितेश राणेंसह नारायण राणे यांच्या गटातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. 

शिवसेनेने कणकवलीत दिला उमेदवार 
कणकवलीत भाजपने नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश यांना उमेदवारी दिली आहे. भाजपची शिवसेनेसोबत युती असली तरी, राणे यांच्याशी छत्तीसचा आकडा असेलल्या शिवसेनेने या मतदारसंघात सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसकडून सुशील राणे निवडणूक रिंगणात आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 cm devendra fadnavis speech kankavli statement on nitesh rane