Vidhan Sabha 2019 : चिपळुणातील उमेदवाराविषयी उत्कंठा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 September 2019

देवरूख - गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचा शिवसेना प्रवेश निश्‍चित झाला आहे. युती होण्याच्या शक्‍यतेने त्यांच्या उमेदवारीबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाने चिपळूणमधील शिवसेनेच्या उमेदवाराविषयी उत्कंठा वाढली आहे. येत्या ८ दिवसांत हे चित्र स्पष्ट होण्याची शक्‍यता आहे. जाधव गुहागरसाठी इच्छुक आहेत की, चिपळूणसाठी याचे उत्तर त्यांच्या प्रवेशानंतरच मिळणार आहे.  

देवरूख - गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचा शिवसेना प्रवेश निश्‍चित झाला आहे. युती होण्याच्या शक्‍यतेने त्यांच्या उमेदवारीबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाने चिपळूणमधील शिवसेनेच्या उमेदवाराविषयी उत्कंठा वाढली आहे. येत्या ८ दिवसांत हे चित्र स्पष्ट होण्याची शक्‍यता आहे. जाधव गुहागरसाठी इच्छुक आहेत की, चिपळूणसाठी याचे उत्तर त्यांच्या प्रवेशानंतरच मिळणार आहे.  

चिपळूण - संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघ गेली १० वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहे. येथून सदानंद चव्हाण प्रतिनिधित्व करतात. चव्हाण यांनी सलग तिसऱ्यांदा येथून लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांना राष्ट्रवादीचे शेखर निकम यांना टक्‍कर द्यायची आहे. त्यात गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती.

आमदार जाधव हे चिपळूणमधून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे त्याआधी त्यांनीच जाहीर केले होते. त्यामुळे जाधव यांच्या शिवसेनेत येण्यामागे ते चिपळुणातून लढणार असा अर्थ लावला जात होता. दरम्यान, भास्कररावांनी आपण शिवसेना पक्षप्रमुखांना भेटल्याचा खुलासा केला. नंतर समर्थकांची बैठक घेतली. त्यांनी चिपळूणमध्ये पत्रकार परिषद घेत १३ सप्टेंबरला आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले आहे.

त्याचबरोबरीने त्यांनी पक्षप्रमुखांनी संधी दिल्यास गुहागरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे जाहीर करत गुगली टाकली आहे. त्यामुळे भास्कर जाधव पुन्हा स्वगृही परतणार यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. दरम्यान, युती झाल्यास गुहागर हा एकमेव मतदारसंघ भाजपकडे जाऊ शकतो. 

 चिपळूणशिवाय गत्यंतर राहणार नाही...
 गेले काही दिवस आमदार चव्हाण यांना विधान परिषदेवर घेऊन भास्कर जाधव यांना चिपळूणची उमेदवारी मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. जिल्ह्यातील राजकीय स्थिती पाहता जाधवांना चिपळूणशिवाय गत्यंतर राहणार नाही. त्यामुळे चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचा उमेदवार नक्‍की कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

भास्कर जाधव शिवसेनेत आले तर पक्षाला अधिक बळकटी मिळेल. पक्षाने नेहमीच सन्मान राखला यापुढेही राखेल. जाधवांच्या प्रवेशाबाबत पक्षाकडून कोणतीच कल्पना दिलेली नाही. पण पक्ष मजबुतीसाठी नेतृत्वाच्या निर्णयाचे स्वागत करत आहोत.
- सदानंद चव्हाण,
आमदार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Curious about the Chipalun candidate