Vidhan Sabha 2019 : गुहागरच्या जागेवर भाजप सोडणार पाणी ?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 September 2019

गुहागर - युतीमधील तडजोड म्हणून गुहागरच्या जागेवरही भारतीय जनता पक्षाने पाणी सोडले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. गुहागर विधानसभेतील विद्यमान आमदार भास्कर जाधव घड्याळ सोडून हातावर शिवबंधन बांधणार आहेत. त्यामुळे गुहागरची जागा शिवसेनेतर्फे जाधव लढविणार अशी जोरदार चर्चा आहे. 

गुहागर - युतीमधील तडजोड म्हणून गुहागरच्या जागेवरही भारतीय जनता पक्षाने पाणी सोडले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. गुहागर विधानसभेतील विद्यमान आमदार भास्कर जाधव घड्याळ सोडून हातावर शिवबंधन बांधणार आहेत. त्यामुळे गुहागरची जागा शिवसेनेतर्फे जाधव लढविणार अशी जोरदार चर्चा आहे. 

जिल्ह्यातील एक तरी जागा भाजप स्वत:कडे ठेवेल, अशी भाजप कार्यकर्त्यांना आशा होती. जिल्ह्याचा विचार करता राजापूर विधानसभा कायम शिवसेनेकडेच आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ एकेकाळी भाजपचा मानला जात असे. परंतु उदय सामंत यांनी राष्ट्रवादीतून ही जागा 2009 मध्ये जिंकली. 2014 च्या निवडणुकीत आयत्यावेळी शिवसेनेत प्रवेश करत युती नसतानाही विजय खेचून आणला. त्यामुळे या जागेवरही भाजप दावा करू शकत नाही.

चिपळूण संगमेश्वर मतदारसंघही कायम शिवसेनेचाच आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला. मात्र, आमदार भास्कर जाधव यांनीच हा किल्ला दोनवेळा उद्‌ध्वस्त केला. दापोली मंडणगड मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात असला तरी रामदास कदम यांनी योगेश कदम यांच्यासाठी या प्रतिष्ठा पणाला लावली आहे. अशा परिस्थितीत जागावाटपात भाजप गुहागरची जागा मागू शकतो, अशी स्थिती होती. त्यामुळे डॉ. विनय नातू यांनी पुन्हा तयारी सुरु केली होती.

आपल्याच पक्षाला जागा मिळणार, या आशेवर भाजप कार्यकर्ते कामाला लागले. मात्र, मंगळवारी मुंबईमध्ये भाजपची बैठक झाली. या बैठकीत गुहागरची जागा सोडावी लागू शकते, अशी शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. जागावाटपात सद्यस्थितीतील आमदार ज्या पक्षाचा ती जागा त्या पक्षाला असा निकष ठरविण्यात आला आहे. या निकषाप्रमाणे आमदार जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने ही जागा शिवसेनेला सोडावी लागणार आहे. 

वाच्यता न करण्याचे आदेश 
मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा होईपर्यंत तसेच जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईपर्यंत याची कुठेही वाच्यता करू नका, असाही आदेश भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे गुहागरमध्ये भाजप बॅटिंग करणार का, याचा निर्णय होण्यासाठी जागावाटपाच्या शेवटच्या षटकापर्यंत वाट पहावी लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Guhagar Constituency