Vidhan Sabha 2019 : गुहागरात युतीमधील नाराजी शिवसेनेसाठी अडचणीची

मयूरेश पाटणकर
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

गुहागर विधानसभा मतदारसंघात युती, आघाडी, वंचित बहुजन आघाडी, मनसे आणि बसप या पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत, मात्र मुख्य लढत युती विरुद्ध कॉंग्रेस आघाडीमध्येच होणार हे स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेस आघाडीचा भर ओबीसी मतांवर आहे. युतीमधील नाराजी ही शिवसेनेसाठी अडचणीची ठरु शकते. 

गुहागर - गुहागर विधानसभा मतदारसंघात युती, आघाडी, वंचित बहुजन आघाडी, मनसे आणि बसप या पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत, मात्र मुख्य लढत युती विरुद्ध कॉंग्रेस आघाडीमध्येच होणार हे स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेस आघाडीचा भर ओबीसी मतांवर आहे. युतीमधील नाराजी ही शिवसेनेसाठी अडचणीची ठरु शकते. 

गुहागर विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर रामदास राणे यांनी उमेदवारी मागे घेतली. गुहागर मतदारसंघातील शिवसेना उमेदवार भास्कर जाधव गेली 10 वर्ष याच मतदारसंघात राष्ट्रवादी आमदार म्हणून वावरत आहेत. त्यात 5 वर्षे 9 खात्यांचे राज्यमंत्री, कामगारमंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अशी पदे भूषवताना त्याचा लाभ गुहागर मतदारसंघाला झाला. मतदारसंघातील प्रत्येक गाव, तेथील कार्यकर्त्यांची माहिती त्यांना आहे.

गुहागर मतदारसंघात शिवसेनेची सुमारे 30 हजार व भाजपची सुमारे 40 हजार मते आहेत. भास्कर जाधव समर्थकांची मते युतीच्या पारड्यात पडणार आहेत. या परिस्थितीमुळे आज युतीचे पारडे जड आहे, मात्र युतीमधील नाराज गट आणि राष्ट्रवादीतील आज त्यांच्यासोबत असणारे मात्र मनाने राष्ट्रवादीचे असलेले कार्यकर्ते प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी काय करणार यावर जाधव यांच्या मतांचा आकडा कमी-जास्त होऊ शकतो. 

राष्ट्रवादीने आयत्यावेळी शिवसेनेतून पक्षप्रवेश केलेल्या सहदेव बेटकर यांना उमेदवारी दिली. त्यांच्या रुपाने ओबीसी गटाला न्याय दिल्याचा मुद्दा राष्ट्रवादी सातत्याने पुढे आणत आहे, मात्र बेटकर मूळचे संगमेश्‍वर तालुक्‍यातील आहेत.

संपूर्ण मतदारसंघाची आणि तेथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माहिती त्यांना नाही. हे कच्चे दुवे असल्याने कुणबी समाजाच्या एकगठ्ठा मतदानासाठी बेटकर प्रयत्नशील आहेत. भास्कर जाधव निवडून आले, तर पुढच्या पाच वर्षात भाजप टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागेल, अशी भीती भाजप कार्यकर्त्यांना आहे. याच भीतीचे सहानुभूतीत रूपांतर करणे राष्ट्रवादीला जमेल का, यावर बेटकरांचे भवितव्य अवलंबून आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची मदार भीमशक्तीवर अवलंबून आहे. प्रकाश आंबेडकरांचा पक्ष असा प्रचार किमान मतदारसंघातील आंबेडकर समर्थक जनतेमध्ये केला, तर चांगला मतदार वंचितला मिळू शकतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मतदारसंघात काही गावात ताकद आहे. कार्यकर्त्यांना बळ देणे, मतदार वाढविणे एवढेच या पक्षाचे गणित आहे. 

निवडणूक संपली की, अस्तित्व क्षीण 
राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता टिकविण्यासाठी बहुजन समाज पक्ष दरवेळी उमेदवार उभा करतो, मात्र त्या उमेदवाराला पक्षाकडून प्रचारासाठी, प्रवासासाठी काहीच बळ मिळत नाही. निवडणूक संपली, की या पक्षाचे अस्तित्वच संपून जाते. त्यामुळे पाच उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत कॉंग्रेस आघाडी विरुध्द युती असेच आजचे चित्र आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Guhagar constituency special report