Vidhan Sabha 2019 : भाजपचा कार्यकर्ता पेटून उठेल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 October 2019

कणकवली - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्यावर टीका सुरू केली आहे. ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्यावर लढणार आहोत. मात्र, राणेंवर कुणी नाहक टीका करीत असेल, त्यांचा कुणी अपमान करणार असेल तर ते सहन केले जाणार नाही. भाजपचा कार्यकर्ता पेटून उठेल, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी आज दिला.

कणकवली - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्यावर टीका सुरू केली आहे. ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्यावर लढणार आहोत. मात्र, राणेंवर कुणी नाहक टीका करीत असेल, त्यांचा कुणी अपमान करणार असेल तर ते सहन केले जाणार नाही. भाजपचा कार्यकर्ता पेटून उठेल, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी आज दिला. तसेच, प्रचारादरम्यान शिवसेनेवर टीका करणार नसल्याचेही ते म्हणाले. 

येथील मातोश्री मंगल कार्यालयात भाजपचा मेळावा झाला. यात राणे बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, सुरेश सावंत,प्रणिता पाताडे, संदीप कुडतरकर, राजन चिके, स्वाती राणे, रविंद्र शेटये, प्रज्ञा ढवण, नगराध्यक्ष समीर नलावडे आदींसह भाजप आणि राणेंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. राणे म्हणाले, ‘‘आम्ही भाजपत आल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीचे झालो आहोत. आमच्या नवा जुना असा कोणताच भेदभाव नाही. पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच भाजप अध्यक्षांनी दिलेला मी उमेदवार आहे. तसेच मागील पाच वर्षात केलेली विकासकामे आणि जनतेशी ठेवलेला संवाद यामुद्दयांवरच आम्ही निवडणूक लढवीत आहोत. प्रत्येक निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही विरोधी पक्ष राणेंना टार्गेट करत आहेत. राणेंना संपविण्याची भाषा बोलली जात आहे; पण राणेंचा अपमान कुठलाही भाजप कार्यकर्ता सहन करणार नाही.’’

ते म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणूक प्रचारासाठी अवघ्या १३ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. कणकवली मतदारसंघातील १०० टक्‍के सत्ता आपल्या हातात आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःच उमेदवार असल्याप्रमाणे प्रचार यंत्रणेत झोकून द्या. या निवडणुकीत शिवसेनेची काही नेतेमंडळी माझ्यावर टीका करत आहेत; मात्र शिवसेनेच्या टीकेला मी उत्तर देणार नाही.’’

काळसेकर होणार जिल्हा बॅंक अध्यक्ष
जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत आहेत; मात्र भावी अध्यक्ष हे अतुल काळसेकर असतील असे आमदार राणे यांनी सांगितले. 

सीवर्ल्ड, नाणार मार्गी लावणार
कणकवली जिंकण्याचा पूर्ण आत्मविश्‍वास माझ्यात आहे. निवडणूक झाल्यानंतर रखडलेला सीवर्ल्ड, नाणार प्रकल्प मार्गी लावण्याला आपले प्राधान्य असणार आहे. आम्ही फॉर्म आम्ही भरला आणि विजयाचे फटाकेही आम्ही फोडणार आहोत; मात्र कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, असे आवाहन राणे यांनी केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Nitesh Rane comment