Vidhan Sabha 2019 : कोकणात मुलांच्या भविष्यासाठी नेत्यांची प्रतिष्ठा

Vidhan Sabha 2019 : कोकणात मुलांच्या भविष्यासाठी नेत्यांची प्रतिष्ठा

रत्नागिरी - राजकारणात वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची पुढील पिढी निवडणूक रिंगणात नशीब आजमावण्यासाठी उतरली आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांच्या पुढच्या पिढीतील आदित्य ठाकरेंपासून ते रोहित पवारांची नावे घ्यावी लागतील. तशीच परिस्थिती कोकणातही निर्माण झाली आहे. सुनील तटकरे, रामदास कदम आणि नारायण राणे आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी निवडणुकीत दंड थोपटून आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून कोकणातील नेत्यांच्या पुढील पिढीतून रिंगणात कोण उतरणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. त्यावरून गृहकलहालाही सामोरे जावे लागले. कुटुंबांमध्ये दरी पडली होती. प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नेत्यांच्या मुलांची नावे फुटली. त्यात रायगडमधून राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे श्रीवर्धनमधून, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम दापोली - खेडमधून, तर सिंधुदुर्गात कणकवलीतून नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नीतेश राणे भाजपकडून रिंगणात उतरले आहेत. विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोचली असताना मुलांच्या प्रचारासाठी नेत्यांनी जबरदस्त नियोजन केले आहे. त्यामुळे कोकणातील ही निवडणूक पित्यांच्या प्रतिष्ठेची ठरणारी आहे.

नारायण राणेंच्या अस्तित्वाची लढाई

कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून नीतेश राणे निवडणूक रिंगणात आहेत. येथे नारायण राणेंच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. युती असूनही शिवसेनेने राणेंविरोधात उमेदवार दिला आहे. येथे शिवसेनेकडून सतीश सावंत रिंगणात आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे हे दोघेही उमेदवारांच्या प्रचारासाठी कणकवलीत येणार असल्याने सर्वाधिक चर्चेची निवडणूक म्हणून पाहिले जात आहे. राणेंविरोधात सर्व विरोधक एकवटल्याने राणे कुटुंबासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दापोली - खेडमध्ये कदमांना स्वकीयांचे आव्हान

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम दापोली-खेडमधून शिवसेनेकडून उभे आहेत. गेली चार वर्षे योगेश यांनी मोर्चेबांधणी केली होती. शिवसेनेचे पाच टर्म आमदार राहिलेले सूर्यकांत दळवी यांना डावलण्यात आल्याने नाराजी आहे. स्वकीयांचे आव्हान कदमांपुढे आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम तळागाळात पोचलेले असल्यामुळे दुहेरी आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. मुलासाठी कदम मतदारसंघात तळ ठोकून आहेत.

श्रीवर्धनमध्ये काँटे की टक्कर
 सुनील तटकरे यांची कन्या आदिती विरुद्ध शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांच्यात श्रीवर्धनमधून लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत श्रीवर्धनमधून तटकरे यांना ३८ हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. त्यामुळे मुलगी आदितीसाठी तटकरे यांनी सुरक्षित मतदारसंघ शोधला. पण शिवसेनेने कुठल्याही परिस्थितीत राजकीय तडजोड न करणारा उमेदवार दिल्यामुळे इथे काँटे की टक्कर होईल, असे अपेक्षित आहे. त्यामुळे सुनील तटकरेंना पुन्हा रायगडवर आपले वर्चस्व मिळवण्यासाठी ही निवडणूक जिंकावीच लागणार आहे. शिवसेना - भाजप यांची विधानसभेसाठी युती झाल्याने कोकणात महायुतीचे बळ वाढले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसही अस्तित्व दाखवण्यासाठी संघर्ष करत आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस काही प्रमाणात बॅकवर असल्याचे चित्र आहे. यामुळे तटकरे व नारायण राणे यांना विजयासाठी मेहनत घ्यावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com