Vidhansabha 2019 : विद्यमान आमदारांचे भवितव्य पटावर

Raigad-Vidhansabha-Constituency
Raigad-Vidhansabha-Constituency

लोकसभा निवडणुकीत जय-पराजयाचे पडसाद विधानसभा, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर उमटण्याची शक्‍यता आहे. विशेषतः विधानसभा निवडणुकीसाठी अलिबागचे आमदार पंडित ऊर्फ सुभाष पाटील, श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे आणि पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांचे राजकीय भवितव्य पटावर लागले आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात रायगडमधील चार आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर हे दोन मतदारसंघ येतात. सध्याच्या स्थितीत महाड मतदारसंघ वगळता अन्य ठिकाणी राष्ट्रवादी आणि शेकापचे वर्चस्व आहे; पण शिवसेना आणि भाजपचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील हे दोन कोकणातील मातब्बर नेते एकत्र आले आहेत. एकेकाळी कट्टर शत्रू असणाऱ्या या नेत्यांनी दोस्ताना करीत रायगडच्या राजकारणात डळमळीत झालेले पाय पुन्हा रोवण्याचे प्रयत्न केले आहेत. यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा लोकसभेच्या निवडणुकीत विजय होणे आवश्‍यक आहे. या विजयावर गुहागरचे भास्कर जाधव, श्रीवर्धन अवधूत तटकरे, अलिबागचे पंडित पाटील आणि पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांचे राजकीय अस्तित्व अवलंबून आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर पराजयाचे खापर इतरांच्या डोक्‍यावर फोडण्याची प्रथा रायगडमध्ये आहे. २०१४ च्या निवडणुकीतही तटकरेंचा पराभव झाल्यानंतर महाडचे माजी आमदार माणिक जगताप, पेणचे रवी पाटील आणि अलिबागचे मधुकर ठाकूर यांनी तटकरेंपासून फारकत घेतली होती. हा वाद बाजूला ठेवून आघाडीचा धर्म पाळताना विधानसभा निवडणुकीत मदत करण्याच्या बोलीवर जगताप, ठाकूर यांनी तटकरेंना मदत केली आहे. त्याची परतफेड राष्ट्रवादीला विधानसभेत करावी लागणार आहे. याचप्रमाणे अनंत गीतेंच्या जय-पराजयाचे पडसाद शिवसेनेच्या उमेदवारावर पडणार आहेत.

लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्या स्थानिक नेत्यांनी एकदिलाने काम केले आहे. त्यामुळे अलिबाग, पेण, श्रीवर्धन, दापोली मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढल्याचे दिसून येते आहे; पण गीतेंचा पराभव झाल्यास युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये दुफळी निर्माण होऊ शकते.

असे आहेत पक्षनिहाय इच्छुक
काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप -
 अदिती तटकरे, धैर्यशील पाटील, पंडित पाटील, माणिक जगताप, भास्कर जाधव, संजय कदम.
शिवसेना-भाजप - रवी पाटील, महेंद्र दळवी, रवी मुंडे, भरत गोगावले, योगेश कदम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com