Vidhansabha 2019 : ‘स्वाभिमान’चा पाया रचणारी लढाई

शिवप्रसाद देसाई
शनिवार, 18 मे 2019

असा आहे राजकीय पट

  • महाराष्ट्र स्वाभिमानसाठी पहिलीच मोठी निवडणूक
  • शिवसेनेसमोर वर्चस्व राखण्याचे आव्हान
  • काँग्रेसवर विधानसभेत उमेदवार शोधण्याची वेळ
  • विकासात्मक मुद्द्यांपेक्षा भावनिक प्रचारावर भर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढाई महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी विधानसभेचा पाया रचणारी आणि शिवसेनेच्या आमदारांना पुढील कालावधीच्या तयारीची ठरली. कोकणातील शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील राजकीय शत्रुत्व या लढतीदरम्यान दिसले. निकालातून आगामी विधानसभेत कोणाचे आसन भक्‍कम असेल, याचा अंदाज येईल.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दोन्ही जिल्ह्यांतील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण हे विधानसभा मतदारसंघ येतात. सध्या कणकवली वगळता उर्वरित ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत. २०१४ च्या पराभवानंतर राणेंनी काँग्रेस सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापला. त्यांनी भाजपला पाठिंबा दिला; पण त्यांचा सत्तेतील जोडीदार शिवसेनेशी शत्रूत्व कायम ठेवले. या पार्श्‍वभूमीवर ‘स्वाभिमान’चे डॉ. नीलेश राणे आणि शिवसेनेचे विनायक राऊत यांच्यात लोकसभेची लढत रंगली.

‘स्वाभिमान’साठी ही लढत पुढील विधानसभेची रंगीत तालीम ठरली. राणे प्रतिस्पर्धी असल्याने शिवसेनेसाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरली. पुढील विधानसभेच्या उमेदवारीसाठी पाच आमदारांच्या कामगिरीचा अर्थात मताधिक्‍याचा विचार केला जाईल, असे संकेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. साहजिकच त्यांनी प्रचारात ताकद पणाला लावली. काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर लढले; मात्र त्यांना आव्हान उभे करता आले नाही. प्रचारातही आघाडीत समन्वय नव्हता. सावंतवाडी, कुडाळमध्ये शिवसेनेचे अनुक्रमे राज्यमंत्री दीपक केसरकर आणि वैभव नाईक आमदार आहेत.

कणकवलीत काँग्रेसचे नीतेश राणे आमदार आहेत. केसरकरांच्या सावंतवाडीत गेल्या लोकसभेला शिवसेनेला विक्रमी मताधिक्‍य होते; या वेळी प्रचारात ‘स्वाभिमान’ने बऱ्यापैकी आघाडी घेतली. येथून शिवसेनेतर्फे पुन्हा केसरकर, भाजपतर्फे माजी आमदार राजन तेली, ‘स्वाभिमान’तर्फे तालुकाध्यक्ष संजू परब आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांची नावे चर्चेत आहेत. विधानसभेत युती झाल्यास तेलींच्या भूमिकेकडे लक्ष असेल.

कुडाळमध्ये गेल्या वेळी वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला होता. या मतदारसंघात आजही स्वाभिमान ताकद राखून आहे; मात्र नाईक यांनीही गावोगावी शिवसेना मजबूत केली आहे. येथे नाईक हेच शिवसेनेचे उमेदवार असतील; मात्र ‘स्वाभिमान’तर्फे राणे कुटुंबातीलच कोणीतरी उमेदवार असू शकतो. कणकवलीत नीतेश राणेंनी मतदारसंघ चांगला बांधलाय. युती झाल्यास ही जागा भाजपकडे जाईल. भाजपकडून प्रमोद जठार, संदेश पारकर उत्सुक आहेत. युती न झाल्यास शिवसेनेतर्फे अरुण दुधवडकर रिंगणात उतरणे शक्‍य आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुरात शिवसेनेतर्फे आमदार राजन साळवींनाच उमेदवारी मिळेल, असे चित्र आहे. आघाडीच्या पारंपरिक जागावाटपातही येथे काँग्रेसला उमेदवारी जाते; पण त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नाही. उलट राष्ट्रवादीतील अजित यशवंतराव येथे गेली काही वर्षे मोर्चेबांधणी करत आहेत.

रत्नागिरीत शिवसेनेच्या उदय सामंतांनी लोकसभा प्रचारात ताकद लावली. त्यांची उमेदवारीही पक्‍की मानली जाते. येथून भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने दावेदार असल्याने युती झाल्यास पेच होऊ शकतो. ही जागा जागावाटपात राष्ट्रवादीकडे जाते; पण त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार नाही. काँग्रेसतर्फे रमेश कीरांचे नाव चर्चेत आहे.

असे आहेत पक्षनिहाय इच्छुक
शिवसेना -
 दीपक केसरकर, वैभव नाईक, अरुण दुधवडकर, राजन साळवी, उदय सामंत, सदानंद चव्हाण.
भाजप - राजन तेली, प्रमोद जठार, संदेश पारकर, अतुल रावराणे, उल्का विश्‍वासराव, बाळ माने, तुषार खेतल.
काँग्रेस - रमेश कीर.
राष्ट्रवादी काँग्रेस - अजित यशवंतराव, शेखर निकम.
महाराष्ट्र स्वाभिमान - नीतेश राणे, नारायण राणे, संजू परब, सतीश सावंत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Ratnagiri Sindhudurg Constituency Swabhiman Party Politics