कोरोनामुळे सिंधुदुर्गात नवरात्रोत्सवात दक्षता

रुपेश हिराप
Thursday, 22 October 2020

असे असले तरी जिल्ह्यातील नवरात्रोत्सव मंडळांनी यंदा अत्यंत साध्या पद्धतीने मास्क व सॅनिटायझरचा योग्य वापर करून खबरदारी घेत श्री देवींची मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - दरवर्षी जिल्ह्यामध्ये नवरात्रोत्सवाची मोठी धूम असते; मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गरबा, दांडिया तसेच इतर कार्यक्रमांना प्रशासनाकडून बंदी ठेवल्याने अनेकांचा उत्साह मावळला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील नवरात्रोत्सव मंडळांनी यंदा अत्यंत साध्या पद्धतीने मास्क व सॅनिटायझरचा योग्य वापर करून खबरदारी घेत श्री देवींची मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. 

जिल्ह्यात नवरात्रोत्सव आला, की जिल्ह्यात दरवर्षी गरबा, दांडिया, नृत्य, विविध गाण्याचे कार्यक्रम, ऑकेस्ट्रा, दशावतारी नाटक आदी विविध कार्यक्रम नऊ दिवस सुरू असतात. या पार्श्‍वभूमीवर विविध प्रकारच्या नृत्य, वेशभूषा स्पर्धाही होत असतात; मात्र यंदा या सर्व कार्यक्रमांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंदी असल्याने यंदा अत्यंत साधेपणाने नवरात्रोत्सव विविध मंडळामार्फत होताना दिसत आहे. नवरात्रोत्सव मंडळांमध्ये नागरिकांची गर्दी होणार नाही, पाचपेक्षा जास्त वेळी व्यक्ती एकाच ठिकाणी थांबणार नाहीत, अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना प्रशासनाकडून दिल्याने मंडळांतर्फे त्यांचे पालन होताना दिसत आहे. मंडळामध्ये देवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्यांचे शारीरिक तापमान थर्मल गनमार्फत मोजणे, सॅनिटायझर लावल्यानंतर मंडपात प्रवेश देणे आदी गोष्टी दक्षतेने पाळल्या जात आहेत. 

सूचनांचे तंतोतंत पालन 
यंदा नवरात्रोत्सव मंडळांना धार्मिक विधी, पूजा, आरतीला परवानगी दिली असली तरी आरती करताना गर्दी न करता सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून दिल्या आहेत. तशी अंमलबजावणी होताना दिसत आहे. प्रशासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन युवा वर्ग तसेच नवरात्रोत्सव मंडळामार्फत योग्य पद्धतीने होत असल्याचे दिसून येत आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vigilance at Navratri due to corona