निवे धरण परिसरातच अधिकाऱ्यांना घेराओ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

""धरणाखालील जमिनीला तडे जाणे हा प्रकार चकीत करणारा आहे मात्र त्यामुळे धरणाला कोणताही धोका नाही. हा भूस्खलनासारखा प्रकार आहे. भूगर्भ शास्त्रज्ञ आल्यानंतर याचा उलगडा होईल. धरणाला गळती असली तरी पाणीसाठा नसल्याने ते धोकादायक नाही. यावर वेळीच उपाय करण्यात येईल.'" 
- अजय दाभाडे,
अधीक्षक अभियंता, पाटबंधारे, रत्नागिरी 

देवरूख - नजिकच्या निवे बु. जोशीवाडी धरण परिसरात जमिनीला तडे गेल्याचा प्रकार घडल्यावर घटनास्थळी दाखल झालेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. अधिकाऱ्यांनी धरणाला धोका नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर वातावरण शांत झाले. 

गेल्या दोन दिवसांपासून धरणापासून 100 मीटर परिसरात जमिनीला तडे जाणे, मोठ्या भेगा पडणे, जमीन खचणे असे प्रकार घडू लागल्यानंतर याची माहिती मिळताच दुपारी पाटबंधारे रत्नागिरीचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासह देवरूखचे अभियंता संजय मुंगळे होते. अधिकारी येताच ग्रामस्थांनी त्यांना घेराओ घातला आणि धरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच असे प्रकार घडल्याचे सांगत रोष व्यक्‍त केला. दाभाडे यांनी धरणाची पाहणी करून ते धोकादायक नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. 

तहसीलदार संदीप कदम यांनीही धरणाची पाहणी केली. आमदार सदानंद चव्हाण, जिल्हापंचायत सदस्य रोहन बने, भाजप तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, सरपंच महेंद्र राजवाडे आदी उपस्थित होते. आमदारांनी संपूर्ण धरणाची व भेगांची पाहणी करीत धरणाच्या गळतीवर वेळीच उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थांनी या परिसरात येणे टाळावे,अशा सूचना तहसीलदारांनी दिल्या आहेत.

या प्रकारात निवेतील ग्रामस्थ संदीप जोशी, प्रकाश जोशी यांच्या बागेतील काजू, नारळ, पोफळीची 100 पेक्षा अधिक झाडे जमिनदोस्त झाल्याचे स्पष्ट झाले. नुकसानीचा पंचनामा करून त्याची भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. येथे भूगर्भ शास्त्रज्ञ भेट देणार आहेत तेव्हा या प्रकाराचे कोडे उलगडेल. 

""धरणाखालील जमिनीला तडे जाणे हा प्रकार चकीत करणारा आहे मात्र त्यामुळे धरणाला कोणताही धोका नाही. हा भूस्खलनासारखा प्रकार आहे. भूगर्भ शास्त्रज्ञ आल्यानंतर याचा उलगडा होईल. धरणाला गळती असली तरी पाणीसाठा नसल्याने ते धोकादायक नाही. यावर वेळीच उपाय करण्यात येईल.'" 
- अजय दाभाडे,
अधीक्षक अभियंता, पाटबंधारे, रत्नागिरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers agitation in Nive Dam region