लुटायला या रे म्हणत कोकणात अशी होते सोन्याची लूट

सचिन माळी
Monday, 26 October 2020

पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा तितक्याच भक्तीभावात जोपसण्यात आली.

मंडणगड (रत्नागिरी) :दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने लुटण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात पालेकोंड या गावी ग्रामस्थांनी एकत्रित येवून या सोन्याची लूट केली. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा तितक्याच भक्तीभावात जोपसण्यात आली. या प्रथेतून मिळणारा आनंद हा अस्सल मातीतील गोडवा असल्याचे ग्रामस्थांमधून सांगण्यात येते.

चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा. साडेतीन मुहुर्तांपैकी दसरा एक मानला जातो. चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. यादिवशी संध्याकाळी आपट्याचे सोनं लुटण्याची कोकणात प्रथा आहे.

हेही वाचा- कोल्हापुरातील भुदरगडचा फये प्रकल्प घालतोय पर्यटकांना साद 

आपट्याच्या झाडाच्या पानांनी भरलेल्या फांद्या आणल्या जातात. त्या अंगणात एका ठिकाणी मातीत पुरून उभ्या केल्या जातात. त्यानंतर गावातील ग्रामस्थ, महिला, मुले एकत्रित जमा होवून त्याची आरती करून पूजा केली जाते. त्यानंतर अजून कोणी गावात राहू नये, सर्वांनी यात सहभागी व्हावे म्हणून सोनं लुटायला या रे...अशा आरोळ्या दिल्या जातात. त्यानंतर सर्वांनी नमस्कार केल्यानंतर उपस्थित सर्वजण या आपट्यारुपी सोन्याची लुटून पळवापळवी करतात. यावेळी घडणारे प्रसंग, गंमतीजमती जीवनात आनंद निर्माण करतात.

आपट्याची पाने सोने वाटण्याची परंपरा;दसर्‍याच्या दिवशी इष्टमित्रांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा आहे. लुटलेलं सोनं नंतर एकमेकांना वाटण्यात येते. त्यातून सामाजिक सलोखा, एकजूट, विचारांची देवाणघेवाण करण्यात येते. गावातील ज्येष्ठ, वरिष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेतले जातात. अस्सल मातीतला हा प्रकार पाहिल्यानंतर मातीतलं सोन लुटण्यासाठी घाम गाळावा लागत असल्याचे प्रेरित होते.

संपादन - अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: villagers came together in Palekond village in Mandangad taluka of Ratnagiri district