esakal | ...अन् ग्रामस्थांनी एकजुटीतून उभारला साकव 
sakal

बोलून बातमी शोधा

villagers made by bridge in ratnagiri

पंचक्रोशीतील आबाल- वृद्ध पावसाळयात या साकवाचा नदीपलिकडे जा- ये करण्यास वापर करत आहेत.

...अन् ग्रामस्थांनी एकजुटीतून उभारला साकव 

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी - तालुक्यातील पेमेंडी बुद्रुक गावात नदीपलीकडे असलेल्या बाणेवाडीकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गच नसल्यामुळे ग्रामस्थांची पंचाईत होत होती. शासनाकडे मागणी करुनही सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. कोरोना कालावधीतही त्याची झळ बसत आहे. यावर पर्याय म्हणून ग्रामस्थांनी एकत्र येत कच्चा साकव बांधत नदीपलिकडे जाण्यासाठी मार्ग तयार करत सर्वांपुढे आदर्श घालून दिला आहे.


तालुक्यातील पेमेंडी बुद्रुक गावातील बाणेवाडी जवळून पानवल नदी वहाते. बाणेवाडी शेजारी नदीपलिकडे टेंभे गावच्या हद्दीत एक 7- 8 कुटुंबांची पाटीलवाडी धनगरवस्ती आहे. कोकणातील बहुतांश धनगर वस्त्यांप्रमाणे ही वस्तीही मुख्य गावापासून दूर जंगलात वसलेली आहे. पावसाळयात पानवल नदी दुथडी भरल्यानंतर या धनगरवस्तीचा इतर जगाशी संपर्क तुटतो. शाळकरी मुले चार महिने शाळेत जाऊ शकत नाहीत. वयोवृद्ध माणसं, आजारी व्यक्ती किंवा गरोदर माता यांना दवाखान्यात नेता येत नाही. डॉक्टरविना वैद्यकीय उपचार मिळू शकत नाही. साधी आशा वर्करही नदी ओलांडून त्या वस्तीवर येऊ शकत नाही. बाणेवाडीतील शेतक-यांना शेतीच्या कामासाठी पलिकडे जाता येत नाही. त्यासाठी बाणेवाडीजवळ कावळीकोंड येथील गणपती विसर्जन घाटाशेजारी पानवल नदीवर कॉजवे किंवा पक्क्या साकवाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थ करत आहेत. तथापि आजतागायत पक्का साकव बांधून मिळालेला नाही. सध्या कोरोनाची साथ असल्याने दुर्दैवाने पावसाळयात कोणाला कोरोनाची लागण झाल्यास त्याला नदीपार करुन दवाखान्यात नेणे अशक्य आहे. पाटीलवाडी वस्तीतील तरुणांनी सरकारी कॉजवे बोधून मिळण्याची वाट न बघता सामाजिक बांधिलकीतून नदीपलिकडील पोमेंडी बुद्रुक गावच्या चंद्रकांत बाणे, दत्ता शिंदे, पोमेंडी बुद्रुक यांच्या पुढाकाराने कावळी कोंड येथे पानवल नदीवर तात्पुरता साकव बांधण्याचे ठरविले. त्यानंतर पाटीलवाडी वस्तीतील तरुणांनी लोकवर्गणी व अंगमेहनतीच्या जोरावर लोखंडी अँगल व स्थानिक बांबूंचा वापर करुन पावसाळयापूर्वी नदीवर मजबूत साकव उभारला. या कामासाठी पाली गावचे समाजसेवक आण्णा सामंत यांचे मार्गदर्शन लाभले. सदस्या पंचायत समिती सौ. प्राजक्ता पाटील, श्रीमती विभांजली पाटील, आजी- माजी सभापती, जयश्री जोशी, यांची तळमळ राजू नलावडे, शशी बारगुडे, सरपंच कांचन नागवेकर यांचेही मार्गदर्शन लाभले.

हे पण वाचा - मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी हा तर भाजपचा अपशकुन

पक्का साकवासाठी प्रयत्न करा

पंचक्रोशीतील आबाल- वृद्ध पावसाळयात या साकवाचा नदीपलिकडे जा- ये करण्यास वापर करत आहेत. या उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. विशेषत: गळाभर पाण्यातून भिजत नदी ओलांडणा-या शेतकरी महिला व सणासुदीला येणा-या माहेरवाशिणी मनापासून समाधान व्यक्त करत आहेत. शासनाने अधिक विलंब न लावता या ठिकाणी लवकरात लवकर पक्का साकव बांधून द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image