esakal | रिफायनरी, आयलॉग प्रकल्पास ग्रामस्थांचे समर्थन
sakal

बोलून बातमी शोधा

Villagers Support Nanar Refinery Ilog Port Project Ratnagiri Marathi News

रविवारी (ता. 16) राजापूर तालुक्‍यात कोकण जनकल्याण प्रतिष्ठान, राजापूर शहरातील व्यापारी, नागरिक यांच्यासह सागवे, देवाचे गोठणे विभागातील शिवसेना पदाधिकारी यांची बैठक झाली.

रिफायनरी, आयलॉग प्रकल्पास ग्रामस्थांचे समर्थन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी ) - तालुक्‍याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि रोजगारासाठी नाणार रिफायनरी व आयलॉग प्रकल्प व्हावेत या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा निर्णय देवाचे-गोठणे, सागवे आणि राजापूर बाजारपेठेतील व्यापारी संघटना, कोकण जनकल्याण प्रतिष्ठानने बैठकीत घेतला. या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका मांडण्यासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत. 

रविवारी (ता. 16) राजापूर तालुक्‍यात कोकण जनकल्याण प्रतिष्ठान, राजापूर शहरातील व्यापारी, नागरिक यांच्यासह सागवे, देवाचे गोठणे विभागातील शिवसेना पदाधिकारी यांची बैठक झाली. बैठकीत मंगळवारी (ता. 18) सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

राजापूर तालुकाच नव्हे तर संपुर्ण कोकणच्या विकासासाठी ग्रीन रिफायनरी हा प्रकल्प महत्वाचा टप्पा ठरू शकतो. या प्रकल्पाबाबत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमधून प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर होणारे परिवर्तन याची कल्पना येते. कोकणात अशा प्रकल्पाद्वारे स्थानिकांना रोजगार मिळणार असेल तर ते पाहिले पाहिजे, अशी भूमिका माजी आमदार गणपत कदम यांनी या बैठकीत मांडली. 

या प्रकल्पांना आमचे समर्थन असून कोकणच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही प्रकल्पांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी आणि हे प्रकल्प मार्गी लावावेत, असे मत विलास पेडणेकर यांनी मांडले. या वेळी अविनाश महाजन, जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी शिवलकर, सागवेचे माजी सरपंच विद्दा राणे, शिवसेनेचे देवाचेगोठणेचे विभाग संघटक डॉ. सुनील राणे यांनीही प्रकल्पांचे समर्थन केले. शिवसेनेच्या सागवे विभागाच्या बैठकीतही दोन्ही प्रकल्पांना समर्थन करण्याचा निर्णय झाला. यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेण्याचा निर्णय झाला.

आयलॉगमुळे प्रकल्पामुळे प्रदूषण होणार नसून पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. हा प्रकल्प झालाच पाहिजे अशी मागणी देवाचे-गोठणेतील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांसह ग्रामस्थांनी बैठकीत केली. 
प्रकल्पाला नाटे व आंबोळगड ग्रामस्थांचा पाठिंबा असून ग्रामपंचायतींनीही प्रकल्प व्हावा यासाठी ना हरकत दाखले दिले आहेत. प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका नाही. हे निश्‍चित झाले आहे.

प्रकल्प होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या निवेदनावर शिवसेनेचे विभाग संघटक डॉ. सुनील राणे, उपविभाग प्रमुख विनोद शेलार, संतोष चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य दीपक नागले, उपसभापती प्रकाश गुरव यांसह या विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांसह सुमारे 55 जणांच्या सह्या आहेत. 

रिफायनरी आणि आयलॉग प्रकल्पांबाबत बाहेरची मंडळी आणि एनजीओ गैरसमज पसरवत आहेत. शिवसेनेसह अनेकांचा प्रकल्पांना पाठींबा आहे. प्रकल्पांना विरोध करणे एनजीओंचा व्यावसाय आहे. कोकणच्या विकासाला रोखण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. 

- पंढरीनाथ आंबेरकर, अध्यक्ष, जनकल्याण प्रतिष्ठान 

रोजगार नसल्याने तरुण मुंबई, पुण्याकडे जातो. बाजारपेठेवरही त्याचा परिणाम होत आहे. कोणत्याही भागात होणारी औद्योगिक क्रांती ही त्या भागातील विकासाची नांदी आहे. 
- विलास पेडणेकर, सचिव, व्यापारी संघ, राजापूर  
 

loading image