esakal | नाणारमध्ये रिफायनरीला वाढते समर्थन, मुख्यमंत्र्यांपर्यंत संदेश पोहचणार 
sakal

बोलून बातमी शोधा

Villagers Support To Refinery Send Message To CM

समर्थकांची बाजू कॉंग्रेसश्रेष्ठींच्या माध्यमातून पोहचवावी आणि रत्नागिरी रिफायनरीच्या माध्यमातून कोकण विकासाचे स्वप्न साकार व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी कॉंग्रेसचे माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

नाणारमध्ये रिफायनरीला वाढते समर्थन, मुख्यमंत्र्यांपर्यंत संदेश पोहचणार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी ) - नाणार परिसरासह कोकण विकासाला चालना देणाऱ्या रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला मोठ्या संख्येने शेतकरी जागा देण्यास तयार आहेत. प्रकल्पाला समर्थनही मोठे आहे. मात्र, मोठ्या संख्येने असलेल्या प्रकल्प समर्थकांची बाजू शासनासह मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचू दिली जात नाही, अशी खंत रिफायनरी समर्थक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

समर्थकांची बाजू कॉंग्रेसश्रेष्ठींच्या माध्यमातून पोहचवावी आणि रत्नागिरी रिफायनरीच्या माध्यमातून कोकण विकासाचे स्वप्न साकार व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी कॉंग्रेसचे माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

या वेळी रिफायनरी प्रकल्पाला कॉंग्रेसचा पाठिंबा मिळावा, अशी मागणीही करण्यात आली. रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या कोकण जनकल्याण प्रतिष्ठानसह प्रकल्प समर्थक शेतकऱ्यांशी चर्चा करताना माजी आमदार खलिफे यांनी प्रकल्प समर्थक शेतकऱ्यांची कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोकराव चव्हाण यांची भेट घालून देण्याचे आश्‍वासित केले. 

नाणार, सागवे पसिरामध्ये मोठ्या प्रमाणात कातळ परिसर आहे. मात्र, त्यातून शेतकऱ्यांना कोणतेही उत्पन्न मिळत नाही. आंबा बागायती आहेत; मात्र त्यातून उत्पन्न नगण्य आहे. अशा स्थितीमध्ये या भागात रिफायनरीसारखा प्रकल्प झाल्यास शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळेल. एवढेच नव्हे तर कोकणच्या रखडलेल्या विकासालाही चालना मिळणार आहे.

रिफायनरीसारखा प्रकल्प उभारला गेल्यास येथील आरोग्य, शिक्षण यांचा दर्जा सुधारताना लोकांचे राहणीमान उंचावणार आहे. स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळेल. या सकारात्मक बाबींमधून या भागातील लोकांचे प्रकल्प समर्थन आता वाढू लागले आहे. मात्र, प्रकल्प समर्थकांचे म्हणणे वा आवाज शासनापर्यंत पोहचविला जात नाही, अशी खंत उघडपणे व्यक्त करण्यात आली. 

ऍड. शशिकांत सुतार, ऍड. यशवंत कावतकर, विद्याधर राणे, विलास कुळकर्णी, प्रल्हाद तावडे, मन्सूर काझी, विलास गावकर, जुनेद मुल्ला, सुरेश पवार, काझी, चौगुले उपस्थित होते.