मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत ; विनायक राऊत

मुझफ्फर खान
Monday, 11 January 2021

ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून खूप प्रयत्न झाले. सरकार पडत नाही असे लक्षात आल्यानंतर विरोधकांकडून अनेक प्रकारच्या कृत्रिम अडचणी निर्माण केल्या गेल्या

चिपळूण - मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे काम उजवे आहेच. संघटनात्मक कामाकडेही त्यांचे बारकाईने लक्ष आहे. सर्वच प्रकारच्या अडचणींवर मात करून ठाकरेंची वाटचाल सुरू आहे. ते यशस्वी मुख्यमंत्री झाल्यामुळे भाजपला ते पचत नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री संघटनात्मक कामाकडे लक्ष देत नाहीत अशी चुकीची अफवा पसरवली जात आहे. यातून मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधक करीत असल्याची माहिती रत्नागिरी - सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण येथे पत्रकारांशी बोलताना दिली. 

ते म्हणाले, ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून खूप प्रयत्न झाले. सरकार पडत नाही असे लक्षात आल्यानंतर विरोधकांकडून अनेक प्रकारच्या कृत्रिम अडचणी निर्माण केल्या गेल्या. कोरोनासारखी महामारी जगात आली. महाविकास आघाडीचे सरकारने या संकटावर यशस्वी मात करण्याचा प्रयत्न केला तेव्हाही विरोधकांनी सरकार आणि मुख्यमंत्री ठाकरेंची बदनामी करण्याचा प्रयत्न केला पण अतिषय संयमाने मुख्यमंत्री ठाकरे सर्व प्रकारच्या आव्हानाला सामोेरे गेले. मुख्यमंत्री संघटनात्मक पातळीवर लक्ष देत नाहीत असा चुकीचा समज पसरवण्यात आला आहे. कारण मी त्यांना जवळून बघतोय. मुख्यमंत्र्यांनी संघटनात्मक कामासाठी एक टीम तयार केली आहे. त्यात शिवसेनेचे सर्वच ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यात मी सुद्धा आहे. सोशल मीडियावर आमचा एक ग्रुप तयार करण्यात आला आहे. त्यात मुख्यमंत्री अ‍ॅक्टीव्ह असतात. त्यांना येणारे मेल ते स्वतः चेक करतात. सोशल मीडियावर किंवा मोबाईलवर त्यांना कुणी एखाद्या विषयाचा संदेश पाठवला तर ते तातडीने प्रतिसाद देतात. कार्यकर्त्यांनी सांगितलेले काम आमच्या स्तरावर होणारे असतील तर ते आमच्या टीममधील सहकार्‍यांकडे त्या विषयाची जबाबदारी सोपवतात.

रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच संघटनात्मक बदल

रत्नागिरी जिल्ह्यातील संघटनात्मक बदल लवकरच केले जातील. उत्तर रत्नागिरी भागात मोठे बदल होतील. रत्नागिरी जिल्हा परिषदेत फेब्रुवारी अखेर बदल केले जातील. यापूर्वी ज्यांना स्थान मिळाले नाही त्यांचा विचार जिल्हा परिषदेत होईल. मात्र जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि इतर पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेवून हे बदल घडविले जातील.

हे पण वाचा - धक्कादायक : गुंगीचे औषध देऊन डांबले अन् मुलीला ठार करण्याची धमकी देऊन गर्भवतीवर केले आत्याचार

 

गुहागरचे आमदार भास्कर जाधव अनुभवी आणि ज्येष्ठ आहेत. त्यांनी उत्तर रत्नागिरीची संघटनात्मक जबाबदारी घेतली तर त्याचा पक्षाला नक्कीच फायदा होईल. उत्तर रत्नागिरीमध्ये तेच भाजपला प्रतिआव्हान देऊ शकतात. मी स्वतः त्यांना भेटून उत्तर रत्नागिरीतील संघटनात्मक बाबींकडे लक्ष देण्याची सूचना करणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vinayak raut cm uddhav thackeray