अंकुश राणे खूनाबाबत नारायण राणे गप्प का? ; विनायक राऊत 

शिवप्रसाद देसाई
Thursday, 13 August 2020

अंकुश राणेंचे मारेकरी कोण ? त्यांचा खून कुणी केला? सूत्रधार कोण ? याबाबत राणे गप्प का ?

कुडाळ - अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी तत्परता दाखवून टाहो फोडणारे भाजप खासदार नारायण राणे आपले सख्खे चुलत भाऊ अंकुश राणे यांच्या खून प्रकरणी गप्प का? असा खडा सवाल शिवसेना लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. जिल्ह्यात 2002 पासून निरपराध चार व्यक्तींच्या हत्या झाल्या. त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी करत असल्याची माहिती श्री. राऊत यांनी दिली. 

सुशांत राजपूत मृत्यूप्रकरणी राणे यांनी आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले होते. माजी खासदार नीलेश राणे यांनीही टीका केली होती. या पार्श्‍वभूमीवर येथील पंचायत समितीच्या सभागृहात श्री. राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, जिल्हाप्रमुख संजय पडते, सभापती नूतन आईर, उपसभापती जयभारत पालव, राजन नाईक, अतुल बंगे, विकास कुडाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, सागर नांदोसकर, माजी उपसभापती श्रेया परब, राजू गवंडे, नगरसेवक गणेश भोगटे, सचिन काळप, नागेश आईर, मिलिंद नाईक, संदीप म्हाडेश्‍वर, बाबी गुरव आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार राऊत म्हणाले, “भाजप खासदार राणे हे सुशांत सिंग राजपूत आणि त्याची सचिव दिशा आत्महत्या प्रकरणी शिवसेना, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टाहो फोडत आहेत. या प्रकरणी राणे यांनी ज्या तत्परतेने पत्रकार परिषद घेतली; मात्र ही तत्परता स्वतः पालकमंत्री मंत्री असताना त्यांनी अजिबात दाखविली नाही. त्यांचे चुलत भाऊ अंकुश राणे यांच्या मृत्यूबाबत बोलले नाहीत. अंकुश राणेंचे मारेकरी कोण ? त्यांचा खून कुणी केला? सूत्रधार कोण ? याबाबत राणे गप्प का ? खरं तर सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस तत्परतेने तपासकाम करत आहेत. दुसरीकडे राज्य सरकारने मागणी न करता केंद्र सरकारने हस्तक्षेप करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी लावली आहे. आता याप्रकरणी आम्ही मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे अभिनेता सुशांत सिंगसह सत्यविजय भिसे, रमेश गोवेकर, अंकुश राणे, रमेश मंचेकर यांच्या खूनाच्या, मृत्यूची पुन्हा उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार आहोत. त्यावेळी स्वतः राणे मंत्रीपदावर होते तरीसुद्धा त्यांनी या प्रकरणांची चौकशीची मागणी केली नाही; पण आता आम्ही या चारही खुनाचा तपास उच्चस्तरीय झाला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री ठाकरे व गुहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करत आहोत.”

हे पण वाचाधक्कादायक : कडेवरील बाळ पाहून पोलिसाने दिला स्वत;च्या जेवणाचा डबा; पण भामट्याने साधला वेगळाच डाव

‘त्या’ मुद्द्यावर राणे गप्प का?

महाराष्ट्रातील जनतेवर कर्नाटकी पोलिसांचा उपद्रव काही कमी नाही. कर्नाटकात शिवपुतळा हलविण्यात आल्यानंतर सर्व शिवभक्तांनी या घटनेचा निषेध केला; पण मराठी समाजाचा नेता म्हणून टेंभा मिळविणारे खासदार नारायण राणे हे यावर चकार शब्द काढत नाहीत. यातूनच त्यांचा संधिसाधूपणा दिसून येत असल्याची टीका खासदार राऊत यांनी केली.

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vinayak raut criticism on narayan rane