
आम्ही गप्प बसणार नाही. महसूलमंत्री असताना नारायण राणे यांनी केलेले जमीन घोटाळे बाहेर काढू, असा पलटवार शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला.
रत्नागिरी : नारायण राणेंचा पायगुण वाईट आहे. राणे ज्या पक्षात जातात, त्या पक्षाची सत्ता जाते, ती कधी परत येत नाही. त्यांनी गद्दारीबाबत बोलणे म्हणजे राजकारणातील मोठा विनोद आहे. आम्ही गप्प बसणार नाही. महसूलमंत्री असताना नारायण राणे यांनी केलेले जमीन घोटाळे बाहेर काढू, असा पलटवार शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला. येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेवेळी बोलत होते.
राऊत म्हणाले, ‘‘राणेंनी फक्त मिटक्या मारत बसावे. त्यांना सत्ता काय किंवा सत्तेतील सहभाग काय, आता या आयुष्यात मिळणं शक्य नाही. गद्दारीवर राणेंनी बोलावे यासारखा राजकारणातला दुसरा विनोद नाही. शिवसेनेबरोबर केलेली गद्दारी, काँग्रेसबरोबर केलेली गद्दारी, त्याशिवाय देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा अमित शहा असोत, यांना त्यांनी घाणेरड्या शब्दांत फटकारले आहे. हेसुद्धा कधीतरी देवेंद्र फडणवीस यांनी काढून वाचलं तर खूप बरं होईल.
हेही वाचा - बापरे! चक्क पोलीसाच्या घरात आढळला दारु साठा
चौकशी करायची असेल तर ईडीने नारायण राणेंच्या संपत्तीची चौकशी करावी. भाजपच्या किमान शंभर जणांची नावं आम्ही देऊ शकतो. ईडीने त्यांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. आता भ्रष्टाचार बाहेर यायला सुरवात झाली आहे. हायब्रीड अम्युनिटी या केंद्र सरकारच्या योजनेमध्ये रस्त्यांच्या संदर्भात झालेला महाभ्रष्टाचार घोटाळा हादेखील आम्ही समोर आणला आहे. त्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार.’’
"सत्तेसाठी हपापलेले देवेंद्र फडणवीस आणि त्यांची मंडळी सत्ता न मिळाल्यामुळे सैरभैर होऊन महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत. असं वाटत होतं की, सत्तेच्या खुर्चीवर आपण चिकटून बसू; पण त्यांच्या दुर्दैवाने आणि महाराष्ट्रातील सुदैवाने तसं घडले नाही."
- विनायक राऊत, खासदार
हेही वाचा - शिकार करताना झाली शिकार ; विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू
दिल्लीकर झुकले नाहीत
दिल्लीतील भाजपचे मंत्री, खासदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेहमी कौतुकच करतात. ज्या पद्धतीने सत्तेची हाव धरून देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीवर स्वारी करण्याचा प्रयत्न केला, त्याला दिल्लीकर झुकले नाहीत. अशा सत्तापिपासू व्यक्तीला सत्तेपासून दूर ठेवल्याशिवाय दिल्ली चांगल्या पद्धतीने काम करू शकणार नाही. म्हणून फडणवीसांना वरिष्ठांनी सत्तेपासून दूर ठेवले, असा चिमटा राऊत यांनी काढला.
संपादन - स्नेहल कदम