विशाल गोमंतक, कोकण राज्य या मागणीत दडलयं काय ?

अवित बगळे
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

गोव्याचे राज्य हे ३ हजार ७०२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे आहे. १९९१ मध्ये गोव्यात ६८ टक्के हिंदू, २८ टक्के कॅथोलिक खिस्ती व उर्वरित अन्य धर्मिक होते. वर नमूद केल्याप्रमाणे आजचा गोवा हा पूर्वी तसा नव्हता.

दोडामार्ग तालुका गोव्यात विलीन करावा, अशी मागणी पुढे आली आणि एका नव्या चर्चेला सुरवात झाली. हा विषय नवा नव्हे. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जनतेकडून ही मागणी वेगवेगळ्या नावांनी म्हणजे विशाल गोमंतक, कोकण राज्य आदी नावांनी पुढे येत राहिली आहे. गोव्यातील जनतेला शेजारील प्रदेशाविषयी आणि शेजाऱ्यांना गोमंतकीयांविषयी आत्मीयता का वाटते? याची चर्चा करणारी, या विषयाचे विविध पैलू उलगडणारी वृत्तमालिका आजपासून...

गोव्याची झालेली प्रगती पाहता शेजारील राज्यातील जनतेला गोव्यात यावेसे वाटणे यात नवीन काही नाही. गेल्या कित्येक वर्षांत याविषयीच्या चळवळी वेगवेगळ्या नावांनी सुरू झाल्या आणि थंडावल्या. सर्वांनाच गोव्याविषयी आणि गोव्यातील जनतेला सभोवताच्या प्रदेशाचे आकर्षण वाटणे याचा बारकाईने विचार केला तर हे भूभाग कधी ना कधी गोव्याचा भाग होते हे लक्षात येते. गोव्यातील बराचहा भागही शेजारील कर्नाटक व महाराष्ट्राचा भाग होता ही वस्तुस्थिती नाकारता येणारी नाही. यामुळे गोव्यात जावेसे वाटणे वा स्वतःला गोव्याशी जोडल्या जाण्याच्या चळवळींची पार्श्‍वभूमी या साऱ्या माहितीवर ताडून पाहिली पाहिजे.

महाराष्ट्रातील हा तालुका गोव्यात विलिन करण्यावरून वादंग 

गोवा हा कोकणचा भाग आहे. त्यामुळे भौगोलिक, राजकीय, सांस्कृतिक सलगता आहेच; पण विनायक खेडेकर, डॉ. नंदकुमार कामतांपासून आताचे डॉ. रोहित फळगावकर यांनी वेळोवेळी व्यक्त केलेली मते विचारात घेतली तर प्राचीन गोवा हा ९०० गावांचा म्हणजे आजच्या गोव्यापेक्षा मोठा होता. त्याच्या सीमारेषा दक्षिणेस कर्नाटकातील गोकर्णच्या अलीकडे असलेली गंगावली नदी आणि उत्तरेस कुडाळपुढील नदी अशा होत्या. पोर्तुगीजांनी गोव्यावर कब्जा केल्यावर गोव्याच्या सीमा मर्यादित झाल्या. १९६१ मध्ये गोवा मुक्त झाला, १९८७ मध्ये गोवा राज्य झाले; मात्र हे राज्य पोर्तुगीज सीमारेषांपुरतेच मर्यादित राहिले आहे.

गोव्याचे राज्य हे ३ हजार ७०२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे आहे. १९९१ मध्ये गोव्यात ६८ टक्के हिंदू, २८ टक्के कॅथोलिक खिस्ती व उर्वरित अन्य धर्मिक होते. वर नमूद केल्याप्रमाणे आजचा गोवा हा पूर्वी तसा नव्हता. वेगवेगळ्या राजवटींत गोव्याचा नकाशा वेगवेगळा होता. इसवी सनापूर्वी गोव्यावर कोणाचे राज्य होते याची नेमकी माहिती उपलब्ध होत नाही. दुसऱ्या व तिसऱ्या शतकात मौर्य साम्राजाचा गोवा राज्य भाग होते. पहिल्या शतकात सातवाहन किंवा आंध्रभृत्य यांचे राज्य गोव्यावर होते. दुसऱ्या शतकात अमीरांची राजवट होती. चौथ्या शतकात वनवासी, सहाव्या शतकात मध्यास चालुक्‍यांचे राज्य गोव्यावर होते. दहाव्या शतकापर्यंत राष्ट्रकुटांची सत्ता होती. त्यानंतर गोवा विजयनगर साम्राज्याचा भाग बनला. त्यानंतर कदंबांची गोव्यावर सत्ता होती तर १५१० ते १९६१ पर्यंत गोव्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते.

इतिहास असा....
आज इतिहास शिकवताना विद्यार्थ्यांना गोवा हा ४५० वर्षे पोर्तुगीज जोखडाखाली होता, असे जे शिकवले जाते, तेही अर्धसत्य आहे. पोर्तुगीजांनी तिसवाडी १५१० मध्ये जिंकली. १५४३ मध्ये पोर्तुगीज सत्तेचा विस्तार बार्देश, सासष्टी आणि मुरगावपर्यंत झाला. १७६३ मध्ये फोंडा, सांगे, केपे, काणकोण पोर्तुगीज सत्तेखाली आले, तर १७८८ मध्ये पेडणे, डिचोली व सत्तरीवर पोर्तुगीजांचा अंमल सुरू झाला. 

आंबोलीत पावसाचा रेकॉर्डब्रेक

धर्मांतराचे प्रकार...
पोर्तुगीज काळात धर्मांतराचे अनेक प्रकार झाले. त्यातून स्थलांतरे झाली, ती शेजारील राज्यांत झाली. यामुळे आजही महाराष्ट्रातील व कर्नाटकातील अनेकांचे कुलदैवत गोव्यात आणि गोव्यातील अनेक कुटुंबीयांचे कुलदैवत महाराष्ट्र वा कर्नाटकात अशी स्थिती आहे. सत्तरी, काणकोण, सांगे, केपे तालुक्‍याचा कर्नाटक राज्याशी; तर पेडणे, डिचोली आणि बार्देशचा महाराष्ट्राशी रोटीबेटीचा व्यवहार आजही चालतो. त्यामागील हे सत्य दडून राहू शकत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vishal Gomantak Konkan State Demand Special Article