इंदूरहून खास मतदानासाठी त्या आल्या गुहागरला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

गुहागर - इंदूरमध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉ. नीलम गोखले या केवळ मतदानाकरिता ४,१०० रुपये खर्च करून गुहागरला आल्या होत्या. यावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मतदानाचा विचार सोडून परतीच्या मार्गाला लागावे, असे अनेक वेळा वाटले. तरीदेखील केवळ मोदींसाठी हे अडथळे पार केले, असे डॉ. गोखले यांनी ‘सकाळ’शी 
बोलताना सांगितले. 

गुहागर - इंदूरमध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉ. नीलम गोखले या केवळ मतदानाकरिता ४,१०० रुपये खर्च करून गुहागरला आल्या होत्या. यावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मतदानाचा विचार सोडून परतीच्या मार्गाला लागावे, असे अनेक वेळा वाटले. तरीदेखील केवळ मोदींसाठी हे अडथळे पार केले, असे डॉ. गोखले यांनी ‘सकाळ’शी 
बोलताना सांगितले. 

डॉ. नारायण व डॉ. नीलम गोखले हे दाम्पत्य १९८० पासून २०११ पर्यंत गुहागरमध्ये होते. नीलम वैद्यकीय अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत तर डॉ. नारायण हे खासगी व्यवसाय करत होते. २०११ नंतर ते पुन्हा मध्य प्रदेशमध्ये आपल्या गावी गेले. त्यानंतर मोदी लाट असताना २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांच्या वेळी दोघेही नक्षलग्रस्त भागात वैद्यकीय सेवा पुरवत होते. तर २०१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी दोघेही वैद्यकीय अभ्यास दौऱ्यासाठी परदेशी गेले होते. त्यामुळे दोघांनाही मतदान करता आले नव्हते. मात्र, गेल्या पाच वर्षात मोदींनी घेतलेल्या निर्णयाने डॉ. नीलम प्रभावित झाल्या. यावेळी मोदींसाठी मतदानाला जाण्याचा निर्णय घेतला.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. नारायण प्रवास करू शकत नव्हते. डॉ. नीलम यांनी २२ तारखेला रात्री ९ वा. इंदूर सोडले. मात्र, त्यांची बस रस्त्यात बंद पडली. दुसऱ्या बसने त्या ठाण्यात आल्या. तोपर्यंत आरक्षण केलेली तेजस निघून गेली होती. मांडवी एक्‍सप्रेसमधून त्या २३ तारखेला चिपळूणमार्गे गुहागरला आल्या. याच प्रवासात त्यांची कपड्याची बॅग अन्य प्रवासी घेऊन गेला. त्या गुहागरला आल्या. मतदान केले व पुन्हा मुंबई व रात्रीच्या विमानाने इंदूर गाठण्यासाठी रवाना झाल्या.

इंदूरला मतदार नोंदणी अयशस्वी
गुहागरमधील यादीतून नाव वगळून इंदूरला मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे गुहागरला येऊन मतदान करण्याचा निर्णय मी घेतला, असे डॉ. गोखले यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for voting Dr Neelam Gokhale came form Indore to Guhagar