वाफोली धरण ठरतेय पर्यटनासाठीचे आकर्षण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

ओटवणे - सह्याद्री पट्ट्यात पावसाची संततधार सुरूच असल्याने वाफोली धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे. पाण्याच्या विसर्गाने निर्माण झालेला सुंदर मनमोहक धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे; मात्र या परिसरात वाढलेली झाडी यात अडसर ठरत आहे.

ओटवणे - सह्याद्री पट्ट्यात पावसाची संततधार सुरूच असल्याने वाफोली धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे. पाण्याच्या विसर्गाने निर्माण झालेला सुंदर मनमोहक धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे; मात्र या परिसरात वाढलेली झाडी यात अडसर ठरत आहे.

बांदा - दाणोली या मुख्य मार्गालगतच वाफोली येथे धरण असून याचे फेसाळणारे पाणी आकर्षण ठरत आहे. आंबोली येथे वर्षा पर्यटनाची मजा लुटण्यासाठी जाणारे गोव्यातील पर्यटक याच धरणाच्या जवळून जाणाऱ्या पर्यायी व सोयीस्कर मार्गाचा अवलंब करतात. या मार्गावरून प्रवास करताना केवळ ८० फुटांच्या अंतरावर हे फेसाळणारे पाणी दृष्टीस पडते. त्यामुळे पर्यटक नकळत आणि कुतूहलाने या कृत्रिम धबधब्याखाली मौजमस्ती करण्यासाठी येतात.

आजूबाजूच्या गावातील कुटुंबेसुद्धा रविवारची या छोटेखानी धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी सैर करतात. बांदा बाजारपेठेपासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या या धबधब्याची पर्यटनदृष्ट्या डागडुजी करणे गरजेचे बनले आहे. सुसज्ज पायऱ्या, बैठक व्यवस्था, रहदारीसाठी सुरळीत रस्ता आदी बाबीची पूर्तता झाल्यास पर्यटकांची संख्या वाढून येथे स्थानिकांसाठी रोजगारसुद्धा निर्माण होणार आहे. स्थानिक ग्रामस्थांना दरवर्षी येथे साफसफाई व डागडुजी तात्पुरत्या स्वरूपात करावी लागते. त्यामुळे या धबधब्याच्या विकासासाठी शासन स्तरावरून प्रयत्न व्हायला हवेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wapholi Dam Tourist spot